भ्रष्टाचारात पोलीस विभाग अव्वल
By admin | Published: August 9, 2015 01:26 AM2015-08-09T01:26:06+5:302015-08-09T01:26:06+5:30
भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप देण्यात जिल्ह्याचा पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे गेल्या आठ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत दिसून आले.
९५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त : आठ महिन्यात एसीबीचे १५ सापळे
लोकमत विशेष
दिलीप दहेलकर गडचिरोली
भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे स्वरूप देण्यात जिल्ह्याचा पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे गेल्या आठ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत दिसून आले. १ जानेवारी ते ८ आॅगस्ट २०१५ या कालावधीत गडचिरोलीच्या एसीबीने १५ सापळे रचून एकूण १६ भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
१ जानेवारी ते ८ आॅगस्ट २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एकूण १५ सापळे रचण्यात आले. या आठ महिन्यातील दाखल गुन्हे गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहेत. या कारवाईवरून गडचिरोली जिल्ह्यात भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भ्रष्टाचार रोखण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. समाजाला पोखणाऱ्या भ्रष्टाचाररूपी किडीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जात आहे, असे असतानाही भ्रष्टाचार वाढत असल्याचे दिसून येते. अशा घटनांबाबत होणाऱ्या कारवाईवरून भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये सजगता येत असल्याचे दिसत आहे. यंदा आठ महिन्याच्या कालावधीत झालेल्या कारवाया या नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागृतीची निष्पत्ती आहे. भ्रष्टाचारात गडचिरोली जिल्ह्याचा पोलीस विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागातील चार लाचखोर आरोपींवर एसीबीने कारवाई केली आहे. महसूल व वन विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून महसूल विभागाच्या तीन तर वन विभागाच्या तीन लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे. अपसंपदा बाळगल्या प्रकरणी गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पथकाने लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळत आठ महिन्यांच्या कालावधीत १५ सापळे रचून १६ आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.
१३ लाचखोरांना रंगेहात अटक
दिलीप रामभाऊ अलगुनवार (तलाठी विहीरगाव साझा), नेपालचंद्र दिनदयाल मजुमदार (पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे चामोर्शी), भगिरथ ढिवरूजी भांडेकर (पोलीस पाटील वालसरा), नारायण दिगांबर सोळंखे (वनरक्षक, वनपरिक्षेत्र मार्र्कंडा कं.), अशोक गणपतराव कुंभारे (तलाठी कोटगल साझा), दत्ता मकिंद्रराव भारगवे (वनपरिक्षेत्राधिकारी आसरअल्ली), मिथून सुरेश भोईर (पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे अहेरी), मनोज झेबाजी मोटघरे (शाखा अभियंता, पं.स. आरमोरी), संजय दादाजी आत्राम (मुख्य लेखापाल वन विभाग कार्यालय भामरागड), दयानंद रघुनाथ नागरे (एएसआय, पोलीस स्टेशन आरमोरी), अरूण एकनाथ पिसे (पोलीस हवालदार, पोलीस चौकी मेंडकी), पितांबर निजबोध सुटे (शिल्प निदेशक आयटीआय) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.