आत्मसमर्पित नक्षलवाद्याच्या भावाला दिले पोलीस जवानाने रक्त
By admin | Published: August 5, 2015 01:36 AM2015-08-05T01:36:50+5:302015-08-05T01:36:50+5:30
जंगलात समोरासमोर उभे ठाकल्यावर नक्षलवादी व पोलिसांनी एकमेकांचे रक्त सांडविल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो.
गडचिरोली : जंगलात समोरासमोर उभे ठाकल्यावर नक्षलवादी व पोलिसांनी एकमेकांचे रक्त सांडविल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. परंतु येथे मात्र पोलिसांनी रक्तदान करुन एका आत्मसमर्पित नक्षल्याच्या भावाचा जीव वाचविला आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यांतर्गत मुरंगल येथील रहिवासी रामजी कोलू मज्जी या नक्षल दलम सदस्याने २०१४ मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. काही दिवसांपूर्वी रामजीचा भाऊ दलसू मज्जी याच्या उजव्या हाताला जखम झाली. दलसूने त्यावर प्रथमोपचार केला. मात्र ती दुरुस्त झाली नाही. उलट जखमेचे ट्यूमरमध्ये रुपांतर झाले. अशातच लाहेरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जनसंपर्क बैठक आयोजित केली होती.
या बैठकीदरम्यान दलसूला जखम झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दलसूला स्वखर्चाने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी त्याच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. परंतु परिस्थिती गरिबीची असल्याने पैशाची तजवीज होणे शक्य नव्हते. त्यामुळे दलसूने लाहेरी उपपोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आर्थिक मदत मिळू शकते का, अशी विचारणा केली. त्यावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रकृतीविषयी सर्व माहिती घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ही प्रक्रिया सुरू असतानाच रविवारी दलसूची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विचार न करता रक्तदान केले. यामुळे दलसूचे प्राण वाचले आणि त्याच्या जीवनात आनंद फुलला. (शहर प्रतिनिधी)