पोलिसांच्या मध्यस्थीने वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By admin | Published: September 18, 2015 01:13 AM2015-09-18T01:13:21+5:302015-09-18T01:13:21+5:30
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व कार्यालयाची झालेली तोडफोड प्रकरणी बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते.
राजकीय नेते व नागरिकांचा दबाव : दोन दिवसांपासून खडित होता आरमोरी तालुक्याचा वीज पुरवठा
आरमोरी : वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व कार्यालयाची झालेली तोडफोड प्रकरणी बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात अखेरीस गुरूवारी आरमोरी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वीज कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र यासाठी राजकीय नेते व नागरिकांनी मोठा दबाव त्यांच्यावर टाकला.
आरमोरी तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामीण भागात चार-चार दिवस वीज पुरवठा बंद राहतो. १३ सप्टेंबरला काही नागरिकांनी आरमोरी येथील वीज उपकेंद्राच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी अज्ञात नागरिकांनी दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. रात्री कर्मचारी यंत्रचालक यांनी पोलीस ठाणे गाठून अज्ञात नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई न झाल्याने १६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून आरमोरी तालुक्याचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला होता. गुरूवारी सकाळी आरमोरी पोलिसांनी या प्रकरणात ठाणेगाव येथील सहा नागरिकांना ताब्यात घेतले. ही वार्ता आरमोरी शहरात पसरताच वीज पुरवठा बंद असल्याने संतापलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सुभाष ढवळे यांनी या संदर्भात गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे यांना याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. कवडे व आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, भारीप बहुजन महासंघाचे हंसराज बडोले, संदीप ठाकूर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता म्हस्के, उपविभागीय अभियंता आढाव, वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नाकतोडे, अडकिने यांच्यासोबत पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महावितरणाचे कर्मचारी ताठर भूमिका घेत असेल तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करा, अशी बाजू मांडली. कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचे राजकीय नेत्यांनी यावेळी सांगितले.
याचवेळी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या ठाणेगावच्या सहा युवकांना सोडून देण्यात आले. याप्रसंगी पोलीस ठाण्यात हैदरभाई पंजवानी, नंदू पेट्टेवार, भारत बावणथडे, अनिल सोमनकर, भिमराव ढवळे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, विलास दाणे, विनोद बेहरे, नंदू नाकतोडे, नितीन जोध, मिलिंद खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)