पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:15 AM2018-03-01T00:15:59+5:302018-03-01T00:15:59+5:30
पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०१३-१४ वर्षापासून नक्षलपीडित, आदिवासी मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन सहलीची योजना राबविली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : पोलीस व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०१३-१४ वर्षापासून नक्षलपीडित, आदिवासी मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन सहलीची योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच वर्षात १८ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून या माध्यमातून एकूण १ हजार ४६९ मुला, मुलींना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात आले आहे. सहलीची १९ वी फेरी नुकतीच रवाना करण्यात आली आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मंगळवारी १९ फेरीमधील ८२ मुला, मुलींचा समावेश असलेल्या महाराष्टÑ दर्शन सहलीला हिरवी झेंडी दाखवून ही सहल रवाना करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सम्राट वाघ, अवधूत सिंगारे उपस्थित होते.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मुला, मुलींचे उज्ज्वल भविष्य घडावे, तसेच त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी व्हावा, महाराष्ट्रातील विविध ठिकाणची औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, तसेच महाराष्ट्रातील रूढी, परंपरांचे दर्शन व्हावे, या हेतूने गडचिरोली पोलीस विभागाने दरवर्षी ‘आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती’ सहल योजना राबविली जाते. या सहलीतून जिल्ह्यातील आदिवासी किशोरवयीन मुले, मुली महाराष्ट्र शासनाचे अॅम्बेसॅडर म्हणून नक्षल प्रभावित क्षेत्रात बदल घडवतील, असा आशावाद पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.
मंगळवारी गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातून रवाना करण्यात आलेल्या सहलीमध्ये ८२ मुला, मुलींचा समावेश आहे. यामध्ये दुर्गम आदिवासी भागातील मुलांसह नक्षल पीडित, नक्षल कुटुंबियातील पाल्यांचाही सहभाग आहे. शिवाय पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथकही समाविष्ट आहे. सर्व मिळून एकूण ९१ जणांची सहल गडचिरोली येथून रवाना करण्यात आली आहे.
सहल रवाना करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सहलीत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आदर्श नागरिक बनणार, असा आशावाद मुला, मुलींनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत दिवटे यांनी केले.
सदर सहलीतील विद्यार्थी नागपूर, पुणे व इतर मोठ्या शहरांना भेटी देणार असून शहरी भागात झालेली शैक्षणिक प्रगती, आर्थिक, सामाजिक विकासाची माहिती जाणून घेणार आहेत. शिवाय शहरी भागातील रूढी, परंपरा, संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत.