पुरामुळे अडकलेल्यांना पोलिसांनी दिला आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:26 AM2019-08-25T00:26:27+5:302019-08-25T00:27:00+5:30
शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले.
शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भामरागड येथून एसटी महामंडळाची बस व काळीपिवळी वाहने आलापल्लीला जाण्यास निघाली. परंतु भामरागडपासून काही दूर अंतरावर असलेल्या पोसफुंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. काही वेळाने पाणी उतरल्यानंतर नाला ओलांडून नागरिक ताडगाव येथे पोहोचले. ताडगावच्या पुढे कुडकेली नाल्याच्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत होते. या ठिकाणी सुद्धा प्रवाशी थांबून पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. परंतु आलापल्लीवरून कोणतेच वाहन ताडगावच्या दिशेने येत नव्हते. ही माहिती ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे यांना माहित झाली. त्यांनी नाल्यावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बांडे नदीच्या पुलावरून सुद्धा पाच फूट पाणी वाहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जोखीन उचलून पुढे जाऊ नका, तुमच्या जेवणाची व झोपण्याची व्यवस्था पोलीस मदत केंद्रात करण्यात येईल, असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार सर्व प्रवाशी पोलीस मदत केंद्रात पोहोचले. जेवनानंतर पुरूष व महिला प्रवाशांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था केली. सकाळी पूरपरिस्थिचा अंदाज घेतला असता मार्ग सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. सर्व प्रवाशांना एसटीमध्ये बसवून निरोप दिला. खाकी वर्दीतील माणुसकी बघून प्रवाशी भारावून गेले. पोलीस मदत केंद्रात येताना चिंतातूर असलेल्या प्रवाशांच्या चेहºयावर जाताना मात्र आनंद झळकत होता.