पोलिसांची दारू अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:27 PM2019-07-03T22:27:10+5:302019-07-03T22:27:24+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी १ व २ जुलै रोजी अशा दोन दिवस तालुक्यातील खेडी व आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील दारू अड्यावर धाड टाकून येथून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यातील सात आरोपी फरार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी १ व २ जुलै रोजी अशा दोन दिवस तालुक्यातील खेडी व आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील दारू अड्यावर धाड टाकून येथून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यातील सात आरोपी फरार झाले आहेत.
धानोरा पोलिसांनी १ जुलै रोजी खेडी येथील जंगल परिसरात धाड टाकली असता चार इसम मोहसडवा तयार करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच इसम पळायला लागले. पोलिसांनी एका आरोपीस पकडले व तीन आरोपी फरार झाले. गजेंद्र मोतीराम मडावी रा.खेडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खेडी येथून मोहफूल सडवा, तीन प्लास्टिक ड्रम, असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाईत २ जुलै रोजी पिसेवडधा येथील शेतशिवार व जंगल परिसरात पोलिसांनी धाड टाकली. यावेळी आठ आरोपी मोहफुलाची दारू गाळताना दिसून आले. पोलिसांना पाहताच चार आरोपी फरार झाले. विनोद वारलू आळे (४५), रवींद्र वासुदेव खोडपे (४०) रा.पिसेवडधा, वेलिदास आडकू साखरे (४८) रा.देलनवाडी, संजय भारत चांग (२९) रा.धामनगाव ता.भिवापूर जि.नागपूर हल्ली मुक्काम पिसेवडधा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. श्रावण शिंपी, लोमेश निकोडे, सचिन बोरूले व सितकुरा मोगरकर हे चार आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिसेवडधा येथील शेतशिवारातून २०० लिटरच्या सात प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला १ हजार ४०० लिटर तसेच २० प्लास्टिक ड्रममध्ये दोन हजार लिटर असा एकूण ३ हजार ४०० लिटर मोहफूल सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. खेडी व पिसेवडधा या दोन्ही कारवाया मिळून एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई धानोराचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस शिपाई चेतन फुले, नितीन पिलारे, देवचंद रतनपुरे, प्रकाश कृपाकर, रंगनाथ गावडे, विनोद चुनारकर आदीसह महिला पोलिसांनी पार पडली.
२६ जून रोजी धानोरा पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून धानोरा पोलिसांनी पुन्हा धाडसत्र जोमात सुरू केले आहे.