पोलिसांनी केला नारगुंडा रस्ता दुरूस्त
By admin | Published: February 11, 2016 12:05 AM2016-02-11T00:05:58+5:302016-02-11T00:05:58+5:30
भामरागड तालुक्यातील नारगुंडा ते हलवेर या मार्गाची दुरवस्था झाली होती. येथून चारचाकी व दुचाकी वाहने चालविणेही कठीण झाले होते.
साबांवि सुस्त : पोलीस अधीक्षकाच्या दौऱ्यात नागरिकांनी केली होती रस्त्याची तक्रार
भामरागड : भामरागड तालुक्यातील नारगुंडा ते हलवेर या मार्गाची दुरवस्था झाली होती. येथून चारचाकी व दुचाकी वाहने चालविणेही कठीण झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी मुरूम टाकून हा रस्ता दुरूस्त केला.
नारगुंडा-हलवेर मार्गावर हलवेरपासून तीन ते चार किमीपर्यंतच्या रस्त्याची गिट्टी उखडून गेली होती. त्यामुळे दुचाकी चालविणे कठीण जात होते. दुचाकी चालकांना नाईलाजास्तव जंगलाच्या पायवाटेतून मार्ग काढावा लागत होता. राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीही खराब रस्त्यामुळे बंद झाली होती. गेल्या १६ वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजीकडेही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते. बिआरओच्या पुढाकाराने १६ वर्षांपूर्वी हा रस्ता बनविण्यात आला होता. या मार्गावर कुचेर, खंडीनैनवाडी, नारगुंडा आदी गावे येतात. नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना, नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रास होत होता. पाच वर्षांपासून हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक नारगुंडा येथे भेटीसाठी गेले असता, नागरिकांनी त्यांच्याकडेही या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन रस्त्यावर मुरूम टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामही गडचिरोलीच्या दुर्गम भागात पोलीस प्रशासनालाच करावे लागत आहे, हे यावरून दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)