आरमोरीच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
By admin | Published: May 23, 2016 01:27 AM2016-05-23T01:27:10+5:302016-05-23T01:27:10+5:30
आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर एका पोलीस महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविल्या प्रकरणी
आरोपी फरार : बदनामीकारक संदेश व्हॉटस्अॅपवर पाठविला
आरमोरी : आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर एका पोलीस महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविल्या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार (५२) यांचेवर भादंविचे कलम ५०९ अन्वये रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पोलीस उपनिरिक्षक नारायण बच्चलवार यांच्या आरमोरी व गडचिरोली येथील राहत्या घरी आरमोरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. बच्चलवार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.
कर्तव्यात गंभीर प्रकारची कसूर केल्यामुळे आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांची धानोरा येथील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. मात्र सदर चौकशी एका महिला पोलीस अंमलदाराच्या हस्तक्षेपामुळे सुरू करण्यात आली, असा समज करून पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार यांनी १५ मे २०१६ रोजी रात्री ८.५० वाजता आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या कार्यालयीन व्हॉटस्अॅप ग्रुपवर महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविला. त्यामुळे पोलिसांनी बच्चलवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)