‘इंद्रावती’वरील पुलाला विरोध नागरिकांचा की नक्षलवाद्यांचा? पाेलिस म्हणतात, हा तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:29 AM2023-01-13T11:29:26+5:302023-01-13T11:37:58+5:30
सीमाभागात नागरिकांची निदर्शने
गडचिरोली : भामरागड तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील इंद्रावती नदीवर पूल तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाला चक्क छत्तीसगड सीमेतील आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावातील काही नागरिकांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. ‘आधी आम्हाला मूलभूत सुविधा द्या’, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पुलाच्या बांधकामाला नागरिकांचा मुळात विरोध असण्याचे कोणतेच कारण नसून, हा विरोध म्हणजे नक्षलवाद्यांनी लावलेली फूस आहे, असा संशय पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.
पूल झाल्यास या मार्गाने लोह खनिजाची छत्तीसगडमध्ये वाहतूक होईल. त्यामुळे पुलाला विरोध होत असल्याचे सांगितले जाते. इंद्रावती नदीच्या अलीकडे भामरागड तालुक्यातील कवंडे हे गाव आहे, तर नदीपलीकडे काही किलोमीटरवर छत्तीसगडमधील बेद्रे हे गाव आहे. या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी बैठका घेऊन नागरिकांना या आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावकऱ्यांनी आपल्या या मागणीबाबत कोणतेही निवेदन प्रशासनाकडे दिलेले नाही. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना विचारले असता, पुलाच्या विरोधाबाबत अद्याप आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. आतापर्यंत नागरिकांनी पुलाचे बांधकाम करावे यासाठी मागण्या केल्या आहेत, पण पुलाला विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.
- तर नक्षल्यांच्या अस्तित्वाला लागणार सुरूंग
महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा अशा वाहतुकीसाठी ‘शॉर्ट कट’ असणाऱ्या या मार्गावर दोन राज्यांना विभागणारी इंद्रावती नदी आहे. त्यामुळे या नदीवर पुलाचे बांधकाम होणार आहे. मात्र, तसे झाल्यास या मार्गावर वर्दळ वाढेल आणि पोलिसांना गस्त घालणेही सोपे होईल. परिणामी छत्तीसगडमधून महाराष्ट्रात बिनबोभाटपणे येणे-जाणे करणे नक्षलवाद्यांना कठीण होईल. याच कारणांमुळे लोकांना पुढे करून नक्षलवादी त्या आंदोलनाला बळ देत आहेत, असा संशय भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.