पोलिसांचा दारूविक्रेत्यांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:57 AM2019-03-20T00:57:03+5:302019-03-20T00:59:01+5:30
होळी व धुलीवंदनाचा सण बुधवार-गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या पाडव्याला दारू प्राशन करून धुळवड खेळण्याकडे बहुतांश लोकांचा कल राहात असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीपासूनच मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : होळी व धुलीवंदनाचा सण बुधवार-गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या पाडव्याला दारू प्राशन करून धुळवड खेळण्याकडे बहुतांश लोकांचा कल राहात असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीपासूनच मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले होते. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूला रोख लावण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेऊन आहेत. तसे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून निर्देशही आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कोणकोणत्या छुप्या मार्गाने दारूची आयात केली जाते. कोणत्या वेळेत दारूची आयात होते, याबाबतची सर्व माहिती ठेवून दारूला रोख लावण्यासाठी कृती कार्यक्रमही आखण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर नाकाबंदी केली जात आहे. अहेरी उपविभागातही सर्वच मुख्य मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. या नाकाबंदीदरम्यान आवागमन करणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे दारूविक्रेतेही आता दुसऱ्या पर्यायी मार्गाच्या शोधात निघाले असल्याचे बोलले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रक्रिया सुरू आहे. या काळात या काळात लोकांना सणानिमित्त दारू पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरही नजर आहे. एकूणच पोलीस विभाग कमालीचा सतर्क झाला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चाप
लोकसभा निवडणूक व होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील वाहतूक पोलीस शाखाही सतर्क झाली आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंजसह अहेरी उपविभागातही वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडाभरपासून ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक व चारही मुख्य मार्गावर वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केली जात आहे. परिणामी काही वाहनधारक धास्तावले आहेत.
मोहफूल खरेदी-विक्री व्यवहारावरही करडी नजर
गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून जंगलात मोहफुलाचे झाड मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय गावालगत शेतशिवार तसेच मोकळ्या परिसरात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम जोमात सुरू आहे. घरगुती कामासाठी तसेच जनावरांसाठी मोहफुलाचा वापर केल्यास हरकत नाही. मात्र सदर मोहफुलापासून दारू गाळून ती विक्री करण्यास बंदी आहे. तरीसुद्धा गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात मोहफूल दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोहफुलाचा साठा करून ठेवणे, त्याची विक्री करणे, दारू गाळणे या प्रकारावर पोलीस विभागाची करडी नजर आहे.