पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:31+5:302021-04-25T04:36:31+5:30
विशेष म्हणजे फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच लस देण्याचे नियोजन केले होते; पण दुर्गम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना ...
विशेष म्हणजे फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच लस देण्याचे नियोजन केले होते; पण दुर्गम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लस घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयी किंवा तालुका मुख्यालयावरील केंद्रात जाणेही शक्य झाले नसल्यामुळे अनेक जण लसीपासून वंचित आहेत; पण त्यांच्यासाठी आता थेट त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा जवळपासच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत २६९० पोलीस कर्मचारी आणि १६५ अधिकाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय ३७३ कर्मचारी आणि ३० अधिकाऱ्यांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. मात्र, अजून ४० टक्क्यांच्या आसपास कर्मचारी-अधिकारी लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना चौकाचौकात रोखताना, त्यांची चौकशी व कारवाई करताना, नाकाबंदीत ड्यूटी करताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी येणारा संपर्क आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
(कोट)
आई-बाबा, स्वत:ची काळजी घ्या...
पोलीस खात्यात ड्यूटी करताना बाबांना कधी किती वेळ होईल, हे माहीत नसते. बाहेर ते एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी समजत नाही. आम्ही पोलीस क्वॉर्टरच्या मोजक्या जागेत राहतो. त्यामुळे घरी आल्यानंतर सर्वांशीच त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
- कृतिका गेडाम
पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी
पोलीस खात्यात ड्यूटी करणाऱ्याला वेळेचे बंधन नसते. रात्री-बेरात्री घरी आल्यानंतर ते आंघोळ करू शकत नाही. दररोज कपडेही धुवायला टाकणे शक्य नसते. त्यामुळे आईने कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी हेच आमचे सांगणे असते. आमचे सर्व नातेवाइकांचे आईला हेच सांगत असतात.
- धनंजय पोटावी
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा