पोलिओचा डोज महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:15 PM2018-01-28T22:15:19+5:302018-01-28T22:15:43+5:30
पोलिओ डोज विना एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागानी जनजागृतीवर भर द्यावा. भविष्यात बालकांना पोलिओपासून सुरक्षित राहण्यासाठी आजच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओ डोज पाजणे अत्यंत गरजेचे आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलिओ डोज विना एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागानी जनजागृतीवर भर द्यावा. भविष्यात बालकांना पोलिओपासून सुरक्षित राहण्यासाठी आजच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओ डोज पाजणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा शुभारंभ प्रसंगी खासदार नेते रविवारी बोलत होते. त्यांनी बाळाला दोन थेंब डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, निवासी शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. इंगळे, डॉ. शेंद्रे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना शल्य चिकित्सक डॉ. खंडाते म्हणाले, या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तरी आपल्या बाळाला बुथवर आणून दोन थेंब डोज पाजून निश्चिंत व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या पल्स पोलिओ अंतर्गत ९० हजार ६०३ जणांना हा डोज देणे अपेक्षित आहे. यासाठी १ लाख १७ हजार ७८४ वायल्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार २५८ केंद्रावर पोलिओ डोज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. खंडाते यांनी दिली.
डॉ. किलनाके यांनी मार्गदर्शन केले. तसेच ० ते ५ वयोगटातील एकही बालक या डोज पासून वंचित राहू नये. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. या वयोगटातील मुला मुलींच्या पालकांनी केंद्रावर जाऊन बालकास पोलिओचा डोज दिल्या जाईल, याची काळजी घ्यावी व मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागानी केले आहे.
बसस्थानक व थांब्यावरही व्यवस्था
पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील बसस्थानक, बसथांबे, पेट्रोलपंप, अंगणवाडी, जि. प. शाळा, आठवडी बाजार आदींसह गर्दीच्या ठिकाणी फिरत्या बुथांचीही व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.