दोन मंत्र्यांभोवती गुरफटले वर्षभरातील राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:27 AM2020-12-27T04:27:16+5:302020-12-27T04:27:16+5:30

(फोटो- एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार) (मावळते वर्ष) गडचिरोली : अनेक कडू-गोड आठवणींचा ठेवा ठरलेले मावळते वर्ष २०२० जिल्ह्याच्या राजकारणात ...

The political atmosphere throughout the year revolved around the two ministers | दोन मंत्र्यांभोवती गुरफटले वर्षभरातील राजकीय वातावरण

दोन मंत्र्यांभोवती गुरफटले वर्षभरातील राजकीय वातावरण

Next

(फोटो- एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार)

(मावळते वर्ष)

गडचिरोली : अनेक कडू-गोड आठवणींचा ठेवा ठरलेले मावळते वर्ष २०२० जिल्ह्याच्या राजकारणात काही उलथापालथ घडविणारे ठरले. राज्यात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडीमधील दोन वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार हे या वर्षात जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते. दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याचे पालकत्व निभावण्याची संधी मिळाली आणि कोरोनाचा काळ असतानाही या जिल्ह्यातील कामांना मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.

ना.एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या वरिष्ठ फळीतील नेते आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीलाच त्यांच्याकडे अनपेक्षितपणे गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी आली त्यावेळी शिवसेनेतील तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कॉलर टाईट झाल्या. पण काही दिवसातच कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाले आणि सारे चित्रच बदलून गेले. ना.शिंदे आपल्या ठाणे जिल्ह्यात अडकून पडल्यामुळे टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात येणे त्यांना शक्य नव्हते. त्याचवेळी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे आणि गडचिरोलीशी नाळ जुळलेले ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात देण्यात आली. त्यांनी नेहमीच्या शैलीत बैठकांवर बैठका लावून अनेक कामांचा धडाका सुरू केला. यामुळे शिवसेनेच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली. अखेर कोरोनाचा जोर कमी होताच पुन्हा ना.शिंदे यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेला पुनरूज्जीवित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे येऊन ठेपले आहे.

(बॉक्स)

जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजपला खो

सर्वाधिक सदस्य असतानाही जिल्हा परिषदेत भाजपला विरोधात बसण्याची वेळ यावर्षी आली. अडीच वर्ष भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघाला सोबत घेऊन अध्यक्षपद पटकावले होते. पण जानेवारी महिन्यात झालेल्या खांदेपालटमध्ये आविसं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी मिळून भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली.

शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

वर्षाच्या शेवटी-शेवटी शिवसेनेची गटबाजी चव्हाट्यावर आली. संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष राजगोपाल सुल्वावार यांनी उघड बंड केले. तर दुसरीकडे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी पोतदार यांची बाजू उचलून धरत सुल्वावार यांच्यावर नाकर्तेपणाचा ठपका ठेवला. शेवटी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करत गटबाजीचा तमाशा बंद करण्यात यश मिळवले. पण भविष्यातही त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे.

नगर पंचायतींवर आले प्रशासन

कार्यकाळ संपलेल्या जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्यामुळे त्या नगर पंचायतींवर मागील महिन्यात प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. एका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दोन नगर पंचायतींची जबाबदारी देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक आटोपल्यानंतर नगर पंचायतींचा महासंग्राम सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: The political atmosphere throughout the year revolved around the two ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.