राजकीय नेत्यांनी विकासासाठी एकजूट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:19+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : राज्यात आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षानुवर्ष पुरेल, अशी एवढी खनिज संपत्ती आहे. लोहखनिजावर आधारीत सुरजागड प्रकल्प सुरू झाला तर जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील. जिल्ह्यातील बेकारी पूर्णपणे दूर होईल. मात्र त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकजूट होणे काळाची गरज आहे, अशी भावना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
देसाईगंज जवळील कुरूड येथे मॉ शारदा फुड प्रॉडक्ट राईस इंडस्ट्रिजच्या प्रांगणात आयोजित उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपसाई जग्यासी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. प्रमोद साळवे, सुधीर भातकुलकर, अॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, सुधीर रामानी, राम कांबळे, सतिश विधाते, डॉ. अविनाश शिवणकर, त्रिचंद दासवानी, निलोफर शेख, नलिनी माने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना विदर्भाच्या प्रश्नांची जाणीव असून हे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत. येत्या पाच वर्षात विदर्भाचा विकास नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून पाठपुरावा करण्याची गरज आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ ही बाब राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. उद्योग निर्मितीसाठी दळणवळणाची साधने व मार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न रखडला आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम रोजगाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पटोले यांनी केले.
अनेक जणांकडून निवेदन सादर
सत्कार समारंभाला जाण्यापूर्वी नाना पटोले यांनी देसाईगंज येथील गुरूदेव सेवाश्रमाला भेट दिली. यावेळी गुरूदेव प्रेमींनी सेवाश्रमाच्या विकासासाठी निधी द्यावा, असे निवेदन दिले. निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पटोले यांनी दिले. त्यानंतर देसाईगंज येथील गुरूद्वाराला भेट देऊन गुरूग्रंथ साहेबाचे दर्शन घेतले. शिख समाजातील नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे देसाईगंज येथील पत्रकारांनी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, तसेच पत्रकारांना पेन्शन लागू करावी, असे निवेदन दिले. कंत्राटी तत्वावरकाम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित करण्याबाबतचे निवेदन दिले. पटोले यांनी देसाईगंज महोत्सवालाही भेट दिली.