चामोर्शीत निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची मुसंडी

By Admin | Published: October 29, 2015 02:04 AM2015-10-29T02:04:44+5:302015-10-29T02:04:44+5:30

चामोर्शी नगर पंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांकडून आपली प्रचार यंत्रणा वैशिष्ट्यपूर्णरीतीने रंगतदार करून मतदारांना आकर्षित केल्या जात आहे.

The politics of all political parties in campaigning for Chamorshi | चामोर्शीत निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची मुसंडी

चामोर्शीत निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांची मुसंडी

googlenewsNext

नगर पंचायत : विकास आराखडा तसेच जाहीरनाम्याशिवाय प्रचार
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांकडून आपली प्रचार यंत्रणा वैशिष्ट्यपूर्णरीतीने रंगतदार करून मतदारांना आकर्षित केल्या जात आहे. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आपापसात भिडले असून राजकीय उणीदुणी काढली जात आहे. या सर्व पक्षांची प्रचार यंत्रणा जोरदार राबविली जात असली तरी चामोशी शहराच्या विकासासाठी काय करणार याचा आराखडा एकाही राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारादरम्यान मतदारांसमोर ठेवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या साऱ्याच उमेदवारांचा प्रचार जाहिरनाम्याशिवाय सुरू आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मोठी सभा घेऊन निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढविला. परंतु सभेत राज्य व केंद्र शासनाचे वाभाडे काढण्याशिवाय जनतेला काय देणार, याविषयी चर्चा केली नाही. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर रॅली काढण्यावरच दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते किशोर कन्हेरे यांच्याही सभेत भाजपावर हल्लाबोल करण्यात आला. ही निवडणूक शहराच्या विकासासाठी आहे की राज्यात अथवा केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी आहे, हे कळायला मार्ग नाही. विधानसभा-लोकसभा निवडणुकीसारखी नगर पंचायतीची निवडणूक लढविल्या जात असल्याने मतदार संभ्रमात पडले आहेत.
याशिवाय पक्ष नेते व उमेदवारांकडून मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केल्या जात आहे. महागाई, मंत्र्यांचे विदेश दौरे आदी मुद्यावरूनच काँग्रेसचे नेते भाजपाला घेरत आहेत. तर भाजपा मोदी मोदी करीत मतदारांना गुमराह करीत आहेत. केवळ पैसा व दारू यावरच आपण मैदान मारू शकतो, असा विश्वास उमेदवारांना असल्यामुळे तेही प्रभागाच्या विकासाची चर्चा करताना दिसत नाही. बहुसंख्य सामान्य जनतेला काय पाहिजे याचा विचार कुणीही करताना दिसून येत नाही. मात्र काही सुज्ञ मतदार सत्तेवर येणाऱ्या सत्तारूढ पक्षाकडून शहर विकासाची अपेक्षा करीत आहेत.
चामोर्शी शहरात भूमिगत नाल्या, २४ तास शुद्ध पाणीपुरवठा शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, शहरात जड वाहनांवर निर्बंध, प्रदूषण कमी करणे, सुसज्ज स्मशानभूमी, गडचिरोली रस्त्यावरील मंडळ कार्यालयापर्यंत, आष्टी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत, मूल रस्त्यावर दहेगावपर्यंत व मार्र्कंडादेव रस्त्यावर दुतर्फा विद्युत व्यवस्था, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था, सर्व सुविधा असलेले रुग्णालय व आरोग्य व्यवस्था, एखादे नाट्यगृह अथवा मोठे सभागृह, ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाण्यासाठी सेमाना वनोद्यानाच्या धर्तीवर मोठा बगीचा, मुलांच्या करमणुकीसाठी योजनाबद्ध केंद्र, क्रीडांगणाची व्यवस्था, विविध ठिकाणी शौचालय व प्रसाधनगृह आदी अपेक्षा पूर्ण करू शकणारे नगरसेवक निवडून यावेत व त्यांच्या हाती सत्ता सोपवावी, अशी इच्छा सुज्ञ मतदारांची आहे.
मतदारांची अपेक्षा पूर्ण होणार की, परत ‘येरे माझ्या मागल्या’, अशी अवस्था निर्माण होईल, हे १ नोव्हेंबरलाच कळेल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The politics of all political parties in campaigning for Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.