राजकारणापेक्षा धर्मकारण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:47 AM2017-01-13T00:47:09+5:302017-01-13T00:47:09+5:30

धर्माच्या नावावर नागरिकांच्या मनावर राज्य करता येत असल्याने काही लोकांनी धर्माचा वापर वाईट कृत्यांसाठी सुरू केला आहे.

Politics is dangerous for politics | राजकारणापेक्षा धर्मकारण धोकादायक

राजकारणापेक्षा धर्मकारण धोकादायक

Next

ज्ञानेश महाराव यांचे विचार : गडचिरोली येथे ‘मिट द प्रेस’ कार्यक्रम; नक्षलवाद विविध समस्यांचा परिणाम
गडचिरोली : धर्माच्या नावावर नागरिकांच्या मनावर राज्य करता येत असल्याने काही लोकांनी धर्माचा वापर वाईट कृत्यांसाठी सुरू केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धर्मकारण गुंडांचा अड्डा बनत चालला आहे. वाचनालय बंद पडून देवळांची शिखरे उंच होत चालली आहेत. माणसापेक्षा दगडाला अधिक महत्त्व दिले जात आहे. मोठ्या माणसाला मारून टाकले जात आहे. त्यामुळे राजकारणापेक्षाही धर्मकारण समाजाला सर्वात धोकादायक आहे. नागरिकांनी हा धोका आत्ताच लक्षात घेतला पाहिजे, असे विचार महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले.
स्थानिक पत्रकार भवनात गुरूवारी ‘मिट द प्रेस’ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी स्थानिक पत्रकारांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. नक्षलवादाची समस्या राजकारण, समाजकारण, जातीयवाद, आर्थिक मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव, सोयीसुविधांचा अभाव या सर्वांचे मिश्रण आहे. नक्षलवादाचे अनेक सेल आहेत. व या सेलमध्ये चांगले, वाईट माणसे आहेत. मात्र नक्षल्यांच्या हिंसक कृतीचे कधीच समर्थन केले जाणार नाही. लोकशाहीमध्ये समस्या सोडविण्यासाठी थोडा उशिर होत असला तरी ती समस्या मात्र नक्कीच सुटते. लोकशाहीसारखी दुसरी भिकारशाही नसली तरी लोकशाहीपेक्षा दुसरी उत्तम व्यवस्था या जगात अस्तित्त्वात नाही. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने लोकशाहीबद्दल आदर बाळगले पाहिजे. नक्षलवाद ज्या विविध समस्यांमुळे निर्माण झाला आहे, तो सोडविण्याची ताकद फक्त लोकशाहीमध्ये आहे. हे नक्षल्यांनी विसरू नये. नोटबंदीमुळे काळापैसा गुलाबी झाला आहे. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे आजपर्यंत झालेले नुकसान कधीच भरून निघणार नाही. नोटबंदीच्या या निर्णयाचे भविष्यातही दुष्परिणाम जाणवणार आहेत. देशातील माध्यमे सत्तेला शरण गेली आहेत. त्यामुळे नोटबंदीमुळे भारत बलशाली राष्ट्र होईल, असा आभास निर्माण केला जात आहे. मात्र यामुळे फार मोठे आर्थिक संकट देशावर येणार आहे. जात, धर्म, राज्यवाद, प्रांतवाद हे सर्वच धोकादायक आहेत. यामुळे व्यक्तीचे कर्तृत्त्व करण्याची क्षमता कमी होते. काही संधीसाधू लोक जाणूनबूजून जात, धर्म, राज्य, प्रांतवाद पसरवितात. यापासून जनतेने सावध राहण्याची गरज आहे. टिव्हीवरील बातम्यांचे महत्त्व वाढत चालले असले तरी टिव्ही दृष्टिकोन देऊ शकत नाही. ब्रेकिंग न्यूज दाखविण्याच्या नादात अनेकवेळा अर्धवट व चुकीची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमे देऊन नागरिकांची दिशाभूल करतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे प्रिंट मीडियाला अजिबात धोका नाही. टिव्हीच्या अँकरला बातम्या देताना नाटीकेपणा आणावा लागतो. त्यामुळे बातमीतील जिवंतपणा कमी होतो. वृत्तपत्राचा संपादक दिसत नाही. त्यामुळे त्याला स्वत:ची मते निर्भिडपणे, विचारपूर्वक मांडता येतात. त्यामुळे टिव्हीच्या बातमीपेक्षा प्रिंट मीडियाची बातमी कधीही विश्लेषणात्मक व अचूक असते. याची खात्री दिवसेंदिवस वाचकांना होत चालली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढला असतानाही भारतातील वृत्तपत्रांचा खप कमी न होता तो मागील वर्षी पाच टक्क्यांनी वाढला आहे. मात्र वाढलेल्या स्पर्धेत प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनीही स्वत:चे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, असे मत ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले. (नगर प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे तीन ते चार तुकडे होणे आवश्यक
राज्य निर्मितीसाठी भाषावाद हा मुद्या कधीचाच गौण झाला आहे. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी राजधानीचे स्थळ दोन ते तीन तासांच्या अंतरावर असावे, सकाळी मंत्रालयीन कामासाठी घरून निघालेला नागरिक स्वत:चे काम करून तो त्याच दिवशी परत आला पाहिजे. तेव्हाच समस्यांचे तत्काळ निराकरण होईल. आज महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या मुंबई येथे मंत्रालय आहे. येथील सामान्य व्यक्तीला जाण्यासाठी दोन दिवस व येण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळे येथील नागरिक मुंबईला सहजासहजी जात नाही. त्यामुळे त्याचे कामही होत नाही. मात्र मुंबई जवळपासच्या जिल्ह्यांंमधील नागरिक आपल्या समस्या थेट मंत्रालयात जाऊन सोडवितात. हा इतर महाराष्ट्रीय जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे तीन ते चार तुकड्यांमध्ये विभाजन होणे गरजेचे आहे. विभाजनासाठी स्वतंत्र राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करावा, व त्यानुसार राज्य निर्मिती करावी. विदर्भाचे आंदोलन केवळ राजकीय स्वार्थासाठी केले जात आहे, असा थेट आरोपही ज्ञानेश महाराव यांनी केला.

Web Title: Politics is dangerous for politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.