रांगी परिसरातील तलाव कोरडे
By admin | Published: December 30, 2015 02:04 AM2015-12-30T02:04:26+5:302015-12-30T02:04:26+5:30
धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाणी टंचाईची चाहूल : महसूल व वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ८० टक्के पाऊस पडला. त्यामुळे तलाव पूर्णपणे भरले नाही. तलावामध्ये साचलेले पाणी धान पिकासाठी वापरण्यात आले. त्यामुळे तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरड पडण्यास सुरूवात झाले. उर्वरित पाणी रबी हंगामासाठी वापरण्यात आल्याने तलाव आता पूर्णपणे कोरडे पडले आहेत. डिसेंबर महिन्यात ही स्थिती आहे. जंगलातीलही पाणवटे आटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी फेब्रुवारी महिन्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रांगी परिसरातील ९० टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे जनावरे आहेत. जनावरांना चारण्यासाठी जंगलामध्ये नेले जाते. मात्र जंगलातीलही पाणवटे आटल्याने पाळीव जनावरांना घरी पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून थोड्याफार प्रमाणात असलेल्या जलसाठ्याचा उपसा केला जाऊ नये यासाठी उपाय योजना करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)