जिल्हाधिकाऱ्यांकडून तलावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:38 AM2017-05-20T01:38:18+5:302017-05-20T01:38:18+5:30
पारडी कुपी येथे तलाव खोलीकरण व दुरूस्तीचे काम सुरू आहे. या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देऊन
तलावाच्या दुरूस्तीचे काम सुरू : पारडी कुपीतील नागरिकांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पारडी कुपी येथे तलाव खोलीकरण व दुरूस्तीचे काम सुरू आहे. या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचबरोबर ग्रामवासीयांना मार्गदर्शन केले.
पारडी कुपी येथील शेतकरी धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतात. या ठिकाणी असलेल्या तलाव व बोड्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती व उपसा करण्यात आला नव्हता. त्यामुळे तलाव व बोडी दुरूस्तीची मागणी गावातील नागरिकांकडून केली जात होती. शासनाने तलाव दुरूस्तीच्या कामाला परवानगी दिली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मामा तलावांच्या खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचेही काम केले आहे. सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामाची, वैयक्तिक शौचालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
गावातील जनतेच्या मागणीनुसार आठवड्यातून एक दिवस तलाठ्याने ग्राम पंचायत पारडी कुपीच्या कार्यालयात बसून नागरिकांची कामे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी तलाठ्याला दिले. भेटीच्या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, गटविकास अधिकारी पचारे, उपविभागीय अभियंता दमाहे, शाखा अभियंता वाडेकर, ग्राम पंचायतीचे सरपंच संजय निखारे, उपसरपंच अशोक सोनुले, चंद्रशेखर मुरतेली, संदीप निकुरे, मारगाये आदी मान्यवर उपस्थित होते.
तलावाच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. शासनाच्या मार्फतीने विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची माहिती तलाठी, ग्रामसेवक यांना राहते. त्यांच्याकडून माहिती घेऊन योजनांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.