तहसील कार्यालयाला हेलपाटा मारूनही पांदण रस्ता अपूर्ण
By admin | Published: May 12, 2016 01:37 AM2016-05-12T01:37:03+5:302016-05-12T01:37:03+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते.
चार वर्षे उलटली : चाकलपेठच्या शेतकऱ्यांची अडचण
चामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते. या कामाची २४ लाख ६५ हजार ७२१ रूपये अंदाजपत्रकीय किमत आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सदर कामाची चौकशी करून काम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शीतील प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक अविनाश चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चाकलपेठ ग्रा. पं. अंतर्गत २०११-१२ या वर्षात चालकपेठ ते वाघदरा या २ हजार ७०० मीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. त्यानंतर लाखो रूपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु सदर काम अर्धवटच झाले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही.
६ मे २०१४ व १७ जून २०१४ मध्ये तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, शकुंतला केशरी चौधरी यांच्या शेतापर्यंत मातीकाम झालेले आहे. त्यात ६०० मीटरचा काही भाग काम करणे बाकी आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाही. १७ मे २०१४ ला मंडळ अधिकारी येणापूर यांना चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदारांचे पत्र मिळूनही कामाची चौकशी झाली नाही. ४ डिसेंबर २०१५ ला तहसीलदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना नायब तहसीलदार येणापूर सर्कल यांना ८ डिसेंबर रोजी कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. तरीही चौकशी झाली नाही. २ मे २०१६ ला तहसीलदारांची भेटी घेऊन काम करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत वारंवार तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, मे २०१६ अखेरपर्यंत काम तत्काळ पूर्ण करावे, सदर काम पूर्ण न केल्यास चामोर्शीचे तहसीलदार तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा नगरसेवक अविनाश चौधरी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)