आष्टी मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:26+5:302021-05-23T04:36:26+5:30

चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता, लखमापूर बोरीमार्गे जाणाऱ्या मार्गाने ...

Poor condition of Ashti Marg | आष्टी मार्गाची दुरवस्था

आष्टी मार्गाची दुरवस्था

Next

चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता, लखमापूर बोरीमार्गे जाणाऱ्या मार्गाने आष्टीला जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.

पेट्रोलची अवैध विक्री

मानापूर/देलनवाडी : आरमाेरी तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्रोलपंपावरून पेट्राेल नेतात.

लिंक फेलमुळे कामे ठप्प

अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनेची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाइन केली आहे. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी, तसेच कर्मचारीही बरीच कामे ऑनलाइन स्वरूपात करीत आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीएसएनएल, तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल आहे.

केरोसीनचा पुरवठा नाही

आष्टी : दुर्गम भागात बहुतांश नागरिक अजूनही चुलीवरच स्वयंपाक करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून केरोसिनचा पुरवठा कमी झाल्याने महिलांची अडचण वाढली आहे. केरोसिनचा पुरवठा करण्याची मागणी होत असतानाही शासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. केराेसिनचा पुरवठा अपुरा आहे.

योजनांची जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.

पाण्याचा अपव्यय

देसाईगंंज : नगर परिषदेचे काही ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत. गरीब नागरिकांना नळाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर सार्वजनिक नळ आहेत. मात्र, या एकाही नळाला तोट्या नाहीत. परिणामी, नळ आल्यापासून ते शेवटपर्यंत पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.

देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला

वडधा : देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पाणी टाक्या असुरक्षित

गडचिरोली : पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. प्रत्येक पाणी टाकीला कुंपण करून पाणी टाकीच्या क्षेत्रात प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. सातत्याने मागणी करूनही संरक्षक भिंत बांधण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

पुनर्वसित गावे दुर्लक्षित

देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावांचे १९९४ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे. मात्र, अरततोंडी गाव अर्धेअधिक जुन्याच ठिकाणी असल्याचे दिसून येते.

खुटगावात निवारा बांधा

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

निवारा शेडचा अभाव

जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा, तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सिंचन सुविधेचा अभाव

सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते.

औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात

धानोरा : तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.

एटापल्लीत अतिक्रमण

एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

स्वच्छतेचा पडला विसर

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयांत पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयांतील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी बाहेरगावांवरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोटमार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

भूमिअभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपाधीक्षकाचे पद रिक्त असून सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

Web Title: Poor condition of Ashti Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.