चिरेपल्ली मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:37 AM2021-02-16T04:37:04+5:302021-02-16T04:37:04+5:30
अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने ...
अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे.
आलापल्ली-सिरोंचा मार्गावरून गोलाकर्जी गावापासून २० किमी अंतरावर चिरेपल्ली गाव आहे. गावात ५०० ते ६०० लोकसंख्या आहे. सदर मार्ग गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-खांदला-पत्तीगाव-बोगागुडमवरून चिरेपल्लीकडे येतो. येथून परिसरातील नागरिक नेहमीच आवागमन करतात. तालुका मुख्यालयातील विविध कामाकरिता ये-जा करीत असतात. परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणचा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने येथे मोठा खड्डा पडला हाेता. या मार्गावर खांदलापासून चिरेपल्लीपर्यंत तीन ते चार नाले आहेत. या नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी अनेकदा नागरिकांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. लाेकप्रतिनिधीही रस्त्याच्या दुरूस्तीबाबत उदासीन आहेत.