मामा तलावांच्या दुरुस्तीचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:02 PM2021-09-17T13:02:11+5:302021-09-17T13:05:35+5:30
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. ही तलाव खूप जुनी असून काळाच्या ओघात यातील बहुतांश तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गडचिरोली : वनराईने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतल्या जाते. धानाला सिंचनाची मोठ्या प्रमाणात गरज असते. मामा तलावांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण केल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव असून यातील बहुतांश तलावांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. ही तलाव खूप जुनी असून काळाच्या ओघात अनेक तलावांच्या पाळी फुटल्या आहेत तर कुठे गाळ गोळा झाल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो मात्र अद्याप या तलावांची दुरुस्ती, सफाईकडे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे.
शेडनेट हाऊस शेती करण्याची गरज
धानाेरा : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याची गरज आहे. ही शेती नियंत्रित वातावरणात केली जात असल्याने काेणत्याही हंगामात पिके घेता येतात. जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाऊस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. इतरही शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज आहे.