खड्ड्यांमुळे मार्कंडादेव मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:53+5:302021-04-10T04:35:53+5:30
चामोर्शी : भाविकांचे श्रद्धास्थान व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव तीर्थक्षेत्रात हजारो भाविक राज्यभरातून दर्शनासाठी येतात. परंतु, सध्या ...
चामोर्शी : भाविकांचे श्रद्धास्थान व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव तीर्थक्षेत्रात हजारो भाविक राज्यभरातून दर्शनासाठी येतात. परंतु, सध्या चामोर्शी ते मार्कंडादेव रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने येथून ये-जा करणारे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीतीरावर वसलेल्या मार्कंडेश्वर देवस्थान, उत्तरवाहिनी असलेल्या पवित्रस्थळी हजारो भाविक, नागरिक चामोर्शी ते मार्कंडादेव, चामोर्शी ते व्हाया शंकरपूर हेटी, फराडा ते मार्कंडा या रस्त्याने दररोज ये-जा करतात. मात्र, या रस्त्याने गेल्या पाच-सहा वर्षांपासून चिंचडोह बॅरेजच्या कामाकरिता जड वाहने ये-जा करीत होते. तर चामोर्शी शहराजवळ असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाजवळ असलेल्या शासकीय गोदामात धान्य घेऊन ये-जा करणारी जड वाहने याच मार्गाने येत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागाेजागी खड्डे पडले असून गिट्टी उखडली आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी मार्कंडादेव येथील यात्रा फारशी भरली नाही. त्यामुळे भाविकांचा लाेंढा यावर्षी फारशा प्रमाणात आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थान ट्रस्ट व नागरिकांकडून रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे कानाडोळा केल्या जात आहे. मागणीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने रस्त्याचे सिमेंट काॅंक्रिटीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.