रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:22+5:302021-02-27T04:49:22+5:30
चातगाव परिसरातील मोबाईल धारक त्रस्त धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. ...
चातगाव परिसरातील मोबाईल धारक त्रस्त
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईल धाकर त्रस्त झाले असून टॉवर दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शासकीय आश्रमशाळेत सफाई कर्मचारी भरा
गडचिरोली : तिन्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील शौचालय व प्रसाधनगृह घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. प्रत्येक आश्रमशाळेत सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरावी, अशी मागणी होत आहे.
आरमोरी मार्गावरील पथदिवे सुरू करा
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील बहुतांश पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे या मार्गावर अंधार पसरला राहतो. पहाटेच्या सुमारास या मार्गावर अनेक नागरिक फिरण्यासाठी जातात. नगरपरिषदेने पथदिवे लावावे, अशी मागणी होत आहे.
जननी शिशू सुरक्षा योजनेचा फज्जा
आष्टी : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या जननी शिशू सुरक्षा योजनेचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागामार्फत या योजनेची प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने योजना मर्यादित आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जननी शिशू सुरक्षा योजनेची गावपातळीवर जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरातील वाहने नियंत्रण विना
गडचिरोली : बसस्थानक परिसरात प्रवाशी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही. तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक अस्ताव्यस्त वाहने ठेवतात. पोलीस बंदोबस्त अभावी बसस्थानक परिसरातील खासगी वाहने ठेवली जातात.
हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध विकत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते.त्यामुळे अतिक्रमण काढावे.
किन्हाळा-झरी मार्गावरील विद्युत खांब दुरवस्थेत
देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा ते फरी-झरी या मार्गावरील विद्युत खांब दुरवस्थेत असून ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. विद्युत खांब पूर्व स्थितीत करण्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
वैरागडातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी
वैरागड : गावातील मुख्य रस्त्यावर जड वाहने तासनतास उभी करून मालाची चढ उतार केली जाते. जड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
चपराळा पर्यटन स्थळाचा विकास करा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
प्रशासकीय काम संथगतीने ; नागरिक त्रस्त
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागात रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासन प्रति तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
धानोरा येथे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात आहे.
वीज उपकेंद्र निर्मितीचे काम खोळंबले
सिरोंचा : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्र निर्मितीची मागणी नागरिकांकडून होत आहे.