कोटरा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:34 AM2021-03-24T04:34:17+5:302021-03-24T04:34:17+5:30
कोरची : तालुक्याच्या टोकावर असलेल्या कोटरा परिसरातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात ...
कोरची : तालुक्याच्या टोकावर असलेल्या कोटरा परिसरातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून १७ किमी अंतरावर कोटरा हे गाव आहे. या परिसरात सावली, कैमूल, शिकारीटोला, मुलेटी, हितापाडी, हितकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्शीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, नांदळी, जेतनपार, घुगवा ही गावे येतात. ही सर्व गावे छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसली आहेत. यापैकी अनेक गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने नवीन रस्ते बांधले नाहीत. तसेच जुन्या रस्त्यांची डागडुजी केली नाही. काही रस्त्यांवर सात ते आठ वर्षांपूर्वी डांबर टाकण्यात आले होते. ते डांबर आता पूर्णत: निघून गेल्याने गिट्टी बाहेर पडली आहे. डांबरी रस्त्याला खडीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या भागात तीन ते चार दिवस वीज पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. भ्रमणध्वनी सेवा तर नावापुरतीच आहे. देशभरात फाईव्ह-जी सेवेचे वारे वाहत असताना कोटरा परिसरात मात्र टू-जी सेवा सुद्धा पोहोचली नाही.