सांडरा-अहेरी बायपास मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:35 AM2021-04-15T04:35:11+5:302021-04-15T04:35:11+5:30
सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोयीस्कर मार्ग म्हणून या ...
सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोयीस्कर मार्ग म्हणून या मार्गाला पसंती आहे. अहेरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्येबाबत अजूनही वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याची समस्या अजूनही कायम आहे. आतापर्यंत कित्येक अधिकारी व लोकप्रतिनिधी बदलले. मात्र, रस्त्यांची समस्या ‘जैसे थे’ दिसून येत आहे. याला जबाबदार कोण? रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी वाली कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सदर सांडरा बायपास अहेरी मार्ग तालुकास्थळी जाण्यास जवळचा व सोयीस्कर ठरतो म्हणून बहुतांश वाहनधारक व कर्मचारी व नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात.
सांडरा बायपास मार्गाने गेल्यास सांडरा, व्यंकटरावपेठा, गडअहेरी व अहेरी, तसेच सांडरापासून डाव्या बाजूला गेल्यास इंदाराम काटेपल्ली, देवलमरी, आवलमरी, काेटागुडा, चिंटावंटा, लंकाचेन असे रेगुंठाकडेही याच मार्गाने जातात. या मार्गाचे डांबरीकरण उखडून गिट्टी पूर्णतः बाहेर पडली आहे. चेंदामेंदा झाला आहे. या मार्गाच्या जवळपास असलेल्या गावातील नागरिक रस्त्यावर उखडून पडलेली गिट्टी बांधकामास नेत असल्याचे चित्र दिसून आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यापासून आतापर्यंत दुरुस्ती किंवा देखभाल न केल्याने या मार्गाची अवस्था अतिशय बिकट आहे. परिणामी संबंधित विभागाचा कानाडोळा होत असल्याने या विभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. या मार्गाचे डांबरीकरण किंवा दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.