शिवराजपूर - किन्हाळा मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:36 AM2021-03-19T04:36:18+5:302021-03-19T04:36:18+5:30
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ते किन्हाळा या अत्यंत वर्दळीच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावर ...
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ते किन्हाळा या अत्यंत वर्दळीच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकोळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मोहटोला व किन्हाळा हे कारल्याचे उत्पादन क्षेत्र व बाजारपेठ म्हणून नावारुपाला येत आहे. त्यातच वीटभट्टी कारखाना व उच्च प्रतीची वीट यासाठीही ही गावे परिसरात प्रसिद्ध आहेत. परंतु, या गावांना जाण्यासाठी असलेल्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गतवर्षी मोहटोला ते शिवराजपूरपर्यंत डागडुजी करण्यात आली; परंतु अल्पावधीतच ह्या मार्गावर मोठमोठे खड्डे व काही भागात तर पूर्णत: हा डांबरी रस्ता उखडून गिट्टी बाहेर पडली आहे. अनेक वाहने घसरुन याठिकाणी अपघात झाले आहेत. किन्हाळा मार्गावर दोन दिवसांपासून फरीपर्यंतच डागडुजीचे काम सुरु आहे. हे काम फक्त फरीपर्यंतच होणार असल्याची माहिती आहे. परंतु, शिवराजपूर ते शिरपूर हा मार्ग खड्डेमय झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. शिवराजपूर-मोहटोला-शंकरपूर ही बससेवा या मार्गावरुन मागील वर्षापासून सुरू आहे. तसेच या परिसरातील मुले-मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी देसाईगंज येथे नेहमी ये-जा करतात. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.