अकाली पावसाने धानाची नासधूस

By admin | Published: October 31, 2015 02:16 AM2015-10-31T02:16:47+5:302015-10-31T02:16:47+5:30

अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती.

Poor devastation by Akali rain | अकाली पावसाने धानाची नासधूस

अकाली पावसाने धानाची नासधूस

Next

रोगानंतर निसर्गाची अवकृपा : गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील पिकांचे नुकसान
गडचिरोली : अपुरा पाऊस, कीड, रोगांच्या कचाट्यातून बचावलेले धान पीक कापणीला आले होते. बहुतांश ठिकाणी धानाची कापणीही झाली होती. परंतु गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटे निसर्गाची अवकृपा होऊन गडचिरोली, आरमोरी, देसाईगं तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने कापलेल्या धानाच्या कडपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हाती येत असलेले धान पीक संकटात सापडल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.
देसाईगंज तालुक्यातील विसोरा परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने कापलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. निश्चित व भरपूर पावसाचे व धान पिकाचे क्षेत्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. मात्र चालू हंगामात हा अंदाज खोटा ठरल्याने परिसरातील धान पीक उत्पादक सुरुवातीपासूनच संकटातून मार्ग काढून पीक वाचवित होता. अखेर धान निसवले, कापणी झाली आणि आता बांधणी करुन मळणी केलेले धान घरी आणणे एवढे काम उरले असतांना वरुणराजा बरसल्याने हातचे पीक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विसोरा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने रस्त्यावरील खड्डे, शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचले. शेतांमधील धान पीक कापणीयोग्य होत आहे, काही झाले असून कापणीच्या प्रतीक्षेत आहे तर काही हेक्टरवरील धान पीक कापलेले दुरवस्थेत आहे. कापणीयोग्य आणि कापलेल्या धानावर शुक्रवारी झालेल्या पावसाने परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापलेले धान पीक मळणीसाठी पूर्णत: कोरडे असले पाहिजे त्यात जर ओलावा असेल तर त्याचा थेट परिणाम धान उत्पन्नावर होऊ शकतो.
एकूणच येथील बव्हंशी बळीराजांची आर्थिक घडी फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून असल्यानेच शेती ही या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
देसाईगंत तालुक्यातील कोरेगाव, चोप, बोडधा, रावणवाडी, डोंगरमेंढा, कसारी, शंकरपूर आदी गावांमध्ये शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने कापलेले धान पीक पूर्णत: भिजले. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस न झाल्याने जवळपास ३० टक्के रोवणी झालीच नाही. त्यानंतर धान पीक कसेबसे बचावल्यानंतर पुन्हा कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. अंतिम टप्यात पावसाची आवश्यकता असताना पाऊस झाला नाही. तर धान पीक कापणीनंतर शुक्रवारी पहाटे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील धान पीकावर तुडतुडा व विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. यंदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा सुरूवातीचा हंगामही नुकसानकारकच राहिला. अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे नष्ट झाले. त्यामुळे रोवणी करता आली नाही. पुन्हा तुडतुडा व अकाली पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील १५ ते २० गावांमध्ये अकाली पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाच्या कडपा पूर्णत: भिजल्या. बांध्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धानाला पिवळी कडा येऊन धानाचा भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरातील टेंभा, खरपी, अमिर्झा, चांभार्डा, बोरी, देलोडा, मरेगाव, मौशिखांब गावातील कापलेले धान पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Poor devastation by Akali rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.