ठेंगणा पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:34 PM2019-07-02T22:34:16+5:302019-07-02T22:34:48+5:30
तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
चांदाळा गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर कुंभी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या एक हजारच्या जवळपास आहे. कुंभी गावाला जाताना पोटफोडी नदी पडते. या नदीवर पूल नव्हता, त्यावेळी नागरिक डोंग्याने प्रवास करीत होते. अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर नदीवर पूल बांधण्यात आला. जवळपास दोन फूट उंचीचे पाईप टाकून पूल बांधला आहे. पोटफोडी नदी जंगलातून येते. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढते व पूल पाण्याखाली येते. पावसाळ्यात अनेकवेळा सदर पूल बुडून राहते. या गावात पहिली ते चवथी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पाचवीपासून चांदाळा व अकरावीपासून गडचिरोली येथे यावे लागते. पावसाळ्यात पुलावरून पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते. तर काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत येतात.
गडचिरोली हे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या गावातील नागरिकांनाही गडचिरोली येथे येताना याच पुलाचा सामना करावा लागतो. प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला येथील गावकरी पूल बांधून देण्याची मागणी करतात. निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनाही विसर पडते. त्यामुळे ठेंगण्या पुलाची समस्या कायम आहे. पूल बांधकामाची आश्वासने ऐकून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यानंतर निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल. तसेच जो उमेदवार पूल बांधकामाचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच मतदान केले जाईल, असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.
माडेमूलचाही रस्ता अडतो
कुंभी गावाजवळच माडेमूल हे गाव आहे. माडेमूल गावाला जाण्यासाठीही पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. या गावाला सुद्धा कुंभी गावाप्रमाणेच पाईप टाकून जवळपास तीन ते चार फूट उंचीचा पूल बनविण्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर या पुलावरूनही पाणी वाहते. त्यामुळे या गावातील नागरिकांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.