गढूळ पाणीपुरवठ्याने धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:00 AM2018-08-04T01:00:57+5:302018-08-04T01:02:48+5:30
शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. या रुग्णालयाला कठाणी नदीतून थेट पाणीपुरवठा होत आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालयात गढूळ पाणी येत असल्याने येथील रुग्णांना जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महिला रुग्णालयाची कठाणी नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठीची स्वतंत्र नळ पाईपलाईन आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कठाणी नदी कोरडी पडत असल्याने पाणीटंचाई भासू नये, याकरिता नगर पालिकेच्या वैनगंगा नदीवरील पाणी योजनेची स्वतंत्र नळ पाईपलाईन बसविण्यात आली आहे. या दोन्ही नळ पाईपलाईनमधून रुग्णालयाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र कठाणी नदीतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील रुग्णांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. यासंदर्भात महिला रुग्णालय प्रशासनामार्फत आलम व ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने कठाणी नदीतून टाकीत येणाºया पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे काम होत आहे. मात्र ही तात्पुरती व्यवस्था आहे. सदर रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व कर्मचारी आदींची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णालयात स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. रुग्णालय इमारत बांधकामाच्या प्रस्तावात वॉटर फिल्टर प्लॅन्टचा समावेश असता तर आज ेगढूळ पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता.
याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याची विनंती केली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ३५ लाख रूपयांची तरतूद झाल्यास येथे फिल्टर प्लॅन्ट होईल.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कठाणी नदीमधून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याने पावसाळ्यात गढूळ पाणी येते. यावर उपाय म्हणून आलम व ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात असून कठाणी नदीतून रुग्णालयाच्या टाकीत पडणाºया पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे. रुग्णालयात जलशुद्धीकरण केंद्र आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव सादर करून त्याचे अंदाजपत्रक तयार करावे, अशा आशयाचे पत्र महिला रूग्णालय प्रशासनामार्फत महाराष्टÑ जीवन प्राधिकरण गडचिरोलीच्या उपअभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच या पत्राची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनाही पाठविण्यात आली आहे.
- डॉ.दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक,
जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली