पोराला न्यायाला पोरगी दारात... फेसबुकची मैत्री लग्नाच्या रेशीमबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:39 PM2023-09-27T12:39:00+5:302023-09-27T12:40:26+5:30
तंटामुक्त समितीचा पुढाकार : भाकरोंडीत पार पडला विवाह
पुंजीराम मेश्राम
वडधा (गडचिरोली) : पोस्टर गर्ल चित्रपटात पोराला न्यायाला पोरगी दारात... हे गाणे प्रसिद्ध आहे. या गाण्यातील ओळी आरमोरी तालुक्यातील भाकराेंडी येथे प्रत्यक्षात अनुभवास आल्या.
फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व प्रेमातून नंतर नाते लग्नाच्या रेशीमबंधनात बांधले गेले; पण याकरिता बंधने झुगारून मुलीने चंद्रपूरहून भाकरोंडी गाव गाठले. अखेर तंटामुक्त समितीने २४ सप्टेंबरला दोघांचाही साध्या पद्धतीने विवाह लावून दिला.
राहुल जयदेव टेंभुर्णे (२८, रा. भाकरोंडी) व प्रज्ञा रवी रामटेके (२४, रा. चंद्रपूर) असे या प्रेमवीराचे नाव. त्या दोघांची फेसबुकवर ओळख झाली, फ्रेंडशिपचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघांनी या नात्याला रेशीमबंधनात बांधण्याचे ठरवले. राहुलचे शिक्षण बारावी झालेले असून शेती करतो, तर प्रज्ञा ही दहावी उत्तीर्ण आहे. दोघेही गरीब कुटुंबातील; पण एकमेकांवर त्यांचे घट्ट प्रेम. दोघेही एकाच जातीचे, त्यामुळे जातीची बंधने नव्हती; पण मुलीकडील लोकांचा राहुलसोबत लग्न लावण्यास विरोध होता. विशेष म्हणजे दोघे कधी समोरासमोर एकमेकांना भेटलेले नव्हते, त्यामुळे भेटीची ओढ होतीच.
१४ सप्टेंबरला प्रज्ञा चंद्रपूरहून बसने थेट भाकरोंडीत पोहोचली. त्यानंतर राहुलने कुटुंबाला प्रज्ञावर प्रेम असून विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. तंटामुक्त समितीकडे अर्ज केल्यावर सभा बोलावण्यात आली. त्यात प्रज्ञाच्या कुटुंबास संपर्क करून विवाहाबद्दल संमती मागितली; पण त्यांचा विरोध कायम होता. अखेर सर्वांसमक्ष राहुल व प्रज्ञा यांच्या
संमतीने २४ सप्टेंबरला विवाह लावून दिला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव सहारे, उपाध्यक्ष मोबीन शेख, सदस्य उद्धव बोदेले, पोलिस पाटील मयुरी उसेंडी, यशवंत टेंभुर्णे, मनीराम पदा, नरेंद्र टेंभुर्णे व गावकरी या सोहळ्याचे साक्षीदार होते.
राहुल आई- वडिलांच्या प्रेमाला पारखा
राहुल टेंभुर्णे याच्या आयुष्याची चित्तरकथा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. आईदेखील सोडून गेल. त्यामुळे राहुल याला मामा हिराजी जनबंधू यांचाच आधार आहे. त्यांच्याकडेच तो राहतो. आता त्याच्या आयुष्यात प्रज्ञाच्या रूपाने हक्काची जीवनसाथी आली आहे.