कोत्तागुडम शाळा इमारत कोसळण्याच्या स्थितीत
By admin | Published: June 19, 2014 12:05 AM2014-06-19T00:05:34+5:302014-06-19T00:05:34+5:30
तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कोत्तागुडम शाळेची इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसातच नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कोत्तागुडम शाळेची इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसातच नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जीर्ण झालेल्या शाळेची दुरूस्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून मे महिन्यात आलेल्या वादळात शाळेचा एक भाग खाली कोसळला. शाळेला सुट्या असल्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. दुसऱ्या इमारतीच्या स्लॅबला भेगा गेल्याने लोखंडी रॉड दिसत आहेत. शाळेची दुरूस्ती करण्यासंदर्भात मुख्याध्यापक घनशाम दिखोडकर यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र इमारतीची दुरूस्ती करण्यासंदर्भात कोणतीच पावले प्रशासनाने उचलली नाही. त्यामुळे कोत्तागुडम येथील शाळेची जीर्ण इमारत केव्हाही कोसळू शकते. शाळेच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. कोत्तागुडम शाळेप्रमाणेच अहेरी तालुक्यातील शेकडो इमारती जीर्ण झाल्या आहेत. मात्र त्यांचे प्रस्ताव पं.स. ने जि. प कडे पाठविले नाही.