सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:09 PM2021-06-02T20:09:39+5:302021-06-02T20:12:15+5:30

आयएएस अधिकाऱ्याची उपस्थिती. जनजागृती करीत वळविले गावकऱ्यांचे मन

Positive Vaccination took place in the remote Binagunda in Gadchiroli while traveling hard coronavirus | सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण

सकारात्मक! खडतर प्रवास करत गडचिरोलीतील अतिदुर्गम बिनागुंडात झाले लसीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देआयएएस अधिकाऱ्याची उपस्थिती. जनजागृती करीत वळविले गावकऱ्यांचे मन

रमेश मारगोनवार

भामरागड (गडचिरोली) : राज्याच्या पूर्व टोकावर, छत्तीसगड सीमेला लागून असलेला आणि जंगलांनी व्यापलेला भामरागड तालुक्यातील डोंगराळ भाग म्हणजे अबुजमाड. नक्षल्यांचा सहज वावर असणाऱ्या या परिसरात पक्के रस्तेच नसल्यामुळे चारचाकी वाहनाने पोहोचणेही एक आव्हान ठरते. अशा या अतिमागास भागात कनिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या चमुला घेऊन जाऊन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल (आयएएस) यांनी गावकऱ्यांमधील गैरसमज दूर करून अशक्य वाटणारे लसीकरण यशस्वी करून दाखवले.

या भागात आदिवासींमधील माडिया जमातीचे वास्तव्य आहे. केंद्र सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे. अशा परिसरात लोकांमध्ये कोविड-१९ लसीकरणाबद्दल पसरलेल्या अफवा आणि गैरसमज दूर करून लसीकरण करणे म्हणजे एक अग्निदिव्य होते. बिनागुंडाचे पाटील रामा दुर्वा यांचा तरुण मुलगा मारोती दुर्वा हा बिनागुंडा येथे कोतवाल म्हणून काम करतो. गावात आरोग्य पथक आले असताना त्याने लस घेतली. पण बिनागुंडा आणि जवळपासच्या छोट्या गावांमध्ये लसीकरणाबाबत गावकऱ्यांमध्ये गैरसमज असल्याने कोणी लस घेण्यास तयार होत नव्हते. ही बाब मारोती दुर्गा याने भामरागडचे तहसील कार्यालय गाठून तहसीलदार अनमोल कांबळे यांना सांगितली. गावाला एक वेळ भेट द्या आणि त्यांना पटवून सांगा, नाहीतर गावात कोरोना आल्यास हाहाकार उडेल, अशी भीती त्याने व्यक्त केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत दुर्गम भागात यशस्वी जनजागृती करून लसीकरण केले. याचे श्रेय अधिकारीवर्गासह आरोग्य पथक आणि महसूल विभागाच्या कोतवालांना जात आहे.

अन् टीम लागली कामाला

तहसीलदार कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना गावकऱ्यांमध्ये असलेल्या गैरसमजाबद्दल माहिती दिली. जिंदल यांनी बिनागुंडा व परिसरातील गावांमध्ये लस कशी देता येईल याची योजना आखली. त्यासाठी चार कॅम्प सुरू केले. पूर्वेकडील शेवटच्या टोकावरील ग्रामपंचायत असलेल्या कुव्वाकोडी, पेरमिलभट्टी, फोदेवाडा आणि बिनागुंडा या चार गावांमध्ये निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्र लावतात त्याच धर्तीवर आरोग्य कॅम्प उघडण्यात आले. स्वत: मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे, तलाठी, कोतवाल आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन गावागावात जाऊन त्यांना एकत्रित करत जनजागृती केली.

खडतर प्रवास, माडिया भाषेत संवाद

मुळात गावोगावी जाण्याचा हा प्रवास धोक्याचा होता. लहान-लहान नाले, दगड, जंगल, डोंगर, दरी, वेली या सगळ्यातून वाट काढत गाडीतून जाणे कठीण होते. तरीही अधिकारी व कर्मचारी गावात पोहोचले. तहसीलदार कांबळे यांनी सुरुवातीला गावातील समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांशी जवळीक साधण्यासाठी हे आवश्यक होते.

हळूहळू हा मुद्दा आरोग्य आणि कोविड याकडे वळविण्यात आला. त्यांना स्थानिक पुढाऱ्यांसह प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा व्हिडीओ दाखविण्यात आला. ते माडिया भाषेत कोविडबद्दल मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे गावकऱ्यांना ते लवकर आणि स्पष्टपणे समजत होते. कोविड लसीकरणासाठी घेतलेली ही सभा नंतर गावातील साध्या समस्यांवर येत होती.

गावकऱ्यांचे अनेक प्रश्न होते ते अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. अखेर गृहभेटी व गोटुल सभेनंतर गावकऱ्यांनी लसीकरणासाठी मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी चार केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. गावच्या पाटलांनी पहिली लस घेतल्यानंतर बाकी लोक पुढे सरसावले. ब्लडशुगर, ब्लडप्रेशर आणि इतर तपासण्या केल्यानंतरच लस देत होते. यात ८७ टक्के लसीकरण झाले.
 

Web Title: Positive Vaccination took place in the remote Binagunda in Gadchiroli while traveling hard coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.