सागवान तस्करीत स्थानिकांच्या सहभागाची शक्यता
By admin | Published: January 6, 2016 01:52 AM2016-01-06T01:52:35+5:302016-01-06T01:52:35+5:30
अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कासरगट्टा फाट्याजवळ वन विभागाने कापसाच्या वाहनातून १२ नग सागवानाची तस्करी होताना माल जप्त केला.
आलापल्ली : अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कासरगट्टा फाट्याजवळ वन विभागाने कापसाच्या वाहनातून १२ नग सागवानाची तस्करी होताना माल जप्त केला. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या घटनेत अहेरी येथील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय परप्रांतातील दोन व्यक्ती येथे येऊन कापूस धंद्याच्या नावाखाली सागवान तस्करीचे काम करूच शकत नाही, अशी चर्चा जोरात पसरली आहे.
सदर कापसाच्या वाहनातून नेण्यात येत असलेला सागवान माल हा रेपनपल्ली वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथून विकत घेतला होता, अशी माहिती मिळाल्यावर वन विभागचा एक पथक नंदीगावकडे अन्य आरोपींच्या शोधात रवाना झाले होते. परंतु पथक पोहोचण्याच्या आतच अवैध वृक्षतोड करणारे तेथून पसार झाले. सदर प्रकरणात दोन आरोपी मात्र परिसरातील असून इतर आरोपी तेलंगणातील आहे. अहेरीच्या काही मोठ्या व्यापारी लोकांचा सहभाग या घटनेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात येऊन कापूस खरेदी करून त्यातच अवैध सागवान भरण्याची हिंमत परप्रांतीय व्यापारी स्थानिकांच्या मदतीशिवाय करू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. अहेरी-आलापल्ली मार्ग दररोज १५ ते २० ट्रक कापूस जात असतो. (वार्ताहर)