नक्षली सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भामरागडमध्ये पोस्टरबाजी; पोलिसांची धाव
By संजय तिपाले | Published: December 2, 2023 11:49 AM2023-12-02T11:49:56+5:302023-12-02T11:50:48+5:30
दरम्यान, या पोस्टरबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तेे हटविले आहे.
गडचिरोली : नक्षल्यांच्या सप्ताहाला २ डिसेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मीडदापल्लीजवळ पोस्टरबाजी करुन नक्षल्यांनी इशारा दिला आहे. या सप्ताहात घातपाती कारवायांचा धोका लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क आहे.
दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षल्यांकडून पीएलजीए सप्ताह पाळला जातो. नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सप्ताहात नक्षल्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. २ डिसेंबरला ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच यंत्रणेला इशारा देखील दिला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या पोस्टरबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तेे हटविले आहे. घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा संपूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून नक्षल्यांच्या हालचालींवर गोपनिय यंत्रणेसह अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचाही वॉच आहे. दरम्यान, नक्षली सप्ताहाच्या आधीख दहा दिवसांच्या अंतराने नक्षलवाद्यांनी तीन निष्पाप नागरिकांची हत्या केली. या घटनांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत निर्माण झाली आहे. नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या वांगेतुरी (ता.एटापल्ली) येथे पोलिस मदत केंद्र सुरु केल्याचा तसेच मोबाइल टॉवर उभारल्याचा वार नक्षल्यांच्या जिव्हारी लागला आहे.