इथं प्यावे लागतेय खड्ड्याचे पाणी, ग्रामपंचायतीसह पंचायत समितीने फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:59 PM2018-04-03T20:59:53+5:302018-04-03T20:59:53+5:30
एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील
मेश मारगोनवार
भामरागड (गडचिरोली): एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तुमरकोडी या गावातील दोन्ही हातपंप निकामी झाल्याने येथील नागरिकांना पाणीच मिळेनासे झाले. परिणामी खड्ड्यातील पाण्यातून त्यांना तहान भागवावी लागत आहे. पण या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
तुमरकोडी हे गाव कोठी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावात दोन हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप महिनाभरापासून बंद पडला आहे तर दुसरा हातपंप सुरू आहे. मात्र या हातपंपातून लाल रंगाचे अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिक त्या हातपंपाचे पाणी पित नाही. हे दोन्ही हातपंप निकामी झाल्याने या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर तोडगा म्हणून गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावालगत असलेल्या नाल्यात लहानसा खड्डा खोदला. या नाल्यातील पाणी पाझरून त्या खड्ड्यात जमा होते. तेच पाणी गावकºयांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
विशेष म्हणजे एक-दोन गुंड पाणी काढल्यानंतर याही खड्ड्यातील पाणी गाळयुक्त होते. मात्र दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गावातील महिला याच खड्ड्यातील पाणी आणत आहेत. उन्हाच्या झळांनी जीव कासाविस होत असल्याने या खड्ड्याचे अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नाही.
अजून उन्हाळ्याचे तीन महिने असेच दिवस काढावे लागणार आहे. त्यामुळे दिवसागणिक या गावातील पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होणार आहे. बंद असलेले हातपंप दुरूस्त करावे, अशी मागणी गावातील पोलीस पाटील गिस्सा मट्टामी, कोमेटी पोदाळी, इरगू लेकामी यांच्यासह नागरिकांनी ग्रामसेवकाकडे केली होती. मात्र ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. येथील ग्रामसेवक मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे गावातील अडचणी त्यांच्या लक्षात येत नाही.
ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्यानंतर नागरिकांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. मात्र दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही हातपंप दुरूस्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांचाही आता नाईलाज झाला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. बंद हातपंप दुरूस्त करावा, त्याचबरोबर नेमक्या कोणत्या कारणामुळे हातपंपातील पाणी लालसर येत आहे याची चाचणी करावी, अशीही मागणी केली जात आहे.