हरणघाट रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य, वाहनधारक त्रस्त; अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 06:22 PM2021-12-20T18:22:46+5:302021-12-20T18:26:05+5:30
हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
गडचिरोली : भेंडाळा तालुक्यातील हरणघाट -चामोर्शी या १४ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर दोन ते तीन किमी परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्डयांमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यासाठी हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.
हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर हरणघाट ते दोटकुली नाल्यापर्यंत व दाेटकुली ते भेंडाळा वीज पाॅवर स्टेशनपर्यंत, तर डांबर प्लांट ते दहेगावपर्यंत जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले असून दहेगाव अंगणवाडीसमोर दोन मोठे खड्डे पडले. या खड्डयातून वाट कशी काढावी, या विवंचनेत वाहनधारक आहेत. चामोर्शी ते डांबर प्लांटपर्यंत वाहन कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चामोर्शी तालुका हा तीर्थक्षेत्राचा व तांदूळ तसेच कापूस उत्पादक म्हणून विदर्भात ओळख असलेला तालुका आहे. या तालुक्याच्या विकासासाठी चामोर्शी हरणघाट मूल हा ३७८ क्रमांकाचा राज्यमार्ग या महामार्गात परावर्तित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
चामोर्शी-चाकलपेठ मार्गाला वाहनधारकांकडून पसंती
चामोर्शी या तालुक्याच्या ठिकाणाहून मूलकडे जाणारी वाहने मुरखळा क्रॉसवरून चाकलपेठ गावातून जात आहेत. त्यामुळे चाकलपेठ गावातील रस्त्याची जडवाहनामुळे वाताहात झाली आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनधारकांना ५ किमी अंतर वळसा घालून मुख्य मार्गावर यावे लागत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दहेगावजवळ मुख्य मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने साधी मलमपट्टी केली नसल्याने रस्त्याचे दुखणे आणखी वाढत चालले आहे.