पेंढरीची आश्रमशाळा समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:14 PM2018-03-11T23:14:51+5:302018-03-11T23:14:51+5:30
अस्वच्छतेचे साम्राज्य : आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
अलाउद्दीन लालानी ।
ऑनलाईन लोकमत
धानोरा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शौचालय व बाथरूमची पाईपलाईन फुटलेली आहे. तसेच स्वयंपाकगृहाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. परिणामी दुर्गंधीने येथील विद्यार्थी त्रस्त आहेत. मात्र या समस्यांकडे प्रकल्प कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.
पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. बारावीच्या कला व विज्ञान अशा दोन शाखा येथे आहेत. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मुख्यालयाला खो देत असल्याने रात्री ही शाळा चौकीदार व परिचराच्या भरवशावर राहते. अधीक्षक कधीकधी रात्री मुक्कामी राहतात, अशी माहिती आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर भटकत असल्याची माहिती आहे. स्वयंपाकगृहात भांडे व्यवस्थित ठेवले जात नाही. एकूणच सदर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांचे भौतिक सुविधा, व्यवस्था व प्रशासकीय कामाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन येथे आवश्यक त्या सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पेंढरी आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत. मात्र याकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष होत आहे. मुख्याध्यापकांसह येथील शिक्षक गडचिरोलीवरून अपडाऊन करतात. त्यामुळे विद्यार्थी आश्रमशाळेबाहेर फिरत असतात. याबाबतची तक्रार आपण प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
- श्रीनिवास दुलमवार, जि.प. सदस्य, पेंढरी-गट्टा क्षेत्र
नऊ पेक्षा अधिक पदे रिक्त
पेंढरी आश्रमशाळेत मराठी, गणित व विज्ञान विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे तीन पदे रिक्त आहेत. माध्यमिक विभागाचे गणित विषयाच्या शिक्षकाचे तर एका प्राथमिक शिक्षकाचे पद रिक्त आहेत. तसेच चौकीदारांची दोन व कामाठी दोन अशी नऊ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.