Coronavirus; गडचिरोलीच्या आदिवासींनी कोरोनाला रोखण्यासाठी तयार केली झाडाच्या सालीपासून पावडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 07:30 AM2021-05-18T07:30:00+5:302021-05-18T07:30:01+5:30
Gadchiroli news कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने या आजाराला रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यात गडचिरोलीच्या आदिवासींनीही स्वत:साठी तयार केलेल्या आयुर्वेदिक पावडरची भर पडली आहे. या पावडरला (औषधाला) कोणीतीही शासकीय मान्यता नसल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो, मात्र या भागातील माडिया जमातीच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे.
रामचंद्र कुमरी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने या आजाराला रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यात गडचिरोलीच्या आदिवासींनीही स्वत:साठी तयार केलेल्या आयुर्वेदिक पावडरची भर पडली आहे. या पावडरला (औषधाला) कोणीतीही शासकीय मान्यता नसल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो, मात्र या भागातील माडिया जमातीच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे. या औषधामुळे कोणतेही आजार होणार नाहीत, या भावनेतून गावकरी या औषधाचे सेवन करत आहेत.
अहेरी - सिरोंचा या मुख्य मार्गापासून आतमध्ये ३० किलोमीटरवर झिंगानूर हे गाव आहे. झिंगानूरसह परिसरातील छोट्या गावांमध्ये आदिवासी माडिया जमातीमधील लोक राहतात. कोरोना नावाच्या आजाराची माहिती या गावापर्यंत पोहोचल्यानंतर गावातील पुजारी आणि पेरमा यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांसाठी औषध तयार करण्यात आले. जंगलातून विशिष्ट झाडांची साल काढून ती गावातील गोटुलमध्ये (समाज भवन) कांडून बारीक करण्यात आली. त्यात इतर आणखी काही आयुर्वेदिक वनस्पती टाकून तयार झालेले पावडर प्रत्येक कुटुंबाला ८० ग्रॅम याप्रमाणे वाटप करण्यात आले. या औषधाला शास्त्रीय आधार नसल्याने सरकारी डॉक्टर त्या पावडरला औषध म्हणून मानायला तयार नाही.
कोणत्या झाडाची साल, गुपित कायम
- गावातील पुजारी किंवा पेरमा नेमके कोणत्या झाडाची साल काढून आणतात. हे मात्र गुपित ठेवतात. गावावर कोणत्याही सामूहिक आजाराचे संकट आले की, या पद्धतीने ते स्वत: जंगलात जाऊन झाडाची साल आणतात आणि गावातील युवा वर्गाच्या हाताने सामूहिकपणे ती कांडून हे पावडर तयार केले जाते.
- हे पावडर तयार केल्यानंतर ग्रामदेवतेची पूजा करून सर्व गावकऱ्यांना तिथेच मोहाच्या पानावर ते पावडर वाटप केले जाते. नंतर ते औषध म्हणून (पावडर) मोहाच्या दारूत टाकून घरातील सदस्यांना दिले जाते. मोहफुलांची दारू हे दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे नियमित पेय असल्याने सर्वजण ते औषध घेतात.
अशा प्रकारचे जडीबुटीचे पावडर दुर्गम भागातील लोक घेत असतील, पण ते कोरानावरील औषध होऊ शकत नाही. त्याला कोणताही शास्रीय आधार नाही. असे असले तरी औषध घेतल्याने आता आजार होणार नाही, असा गावकऱ्यांच्या मानसिकतेता बदल होऊ शकतो.
- डॉ.एम.पी.कन्नाके
तालुका आरोग्य अधिकारी, सिरोंचा