दहा दिवसांपासून वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:08 AM2018-02-26T00:08:59+5:302018-02-26T00:08:59+5:30
तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
ऑनलाईन लोकमत
सिरोंचा : तालुक्यातील बेज्जूरपल्ली येथील विद्युत पुरवठा मागील १० दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. सदर अंतर अधिक असल्याने बेज्जूरपल्ली गावात सिरोंचा तालुक्यातून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा महावितरणकडे करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा येथून विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे. एकदा बिघाड निर्माण झाल्यानंतर आठ ते दहा अथवा पंधरा दिवसांपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे सदर गाव दुर्गम भागात असल्याने अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होते.
अनेकदा विद्युत पुरवठा एकदा खंडित झाल्यास सुरळीत व्हायला १५ ते २० दिवस लागतात. बेजूरपल्ली या गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्या येथे आहेत. यातच पुन्हा अनियमित वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. बेजूरपल्ली येथील लोकसंख्या ८०० च्या आसपास आहे. गावातील नागरिकांना विविध कामे करावी लागतात. याकरिता वीज आवश्यक असते. परंतु वीज समस्या वेळेवर सुटत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
बेज्जूरपल्ली हे गाव सिरोंचा तालुक्यातील आहे. मात्र येथे अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. सदर अंतर अत्यंत लांब होत असल्याने अनेकदा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे बेजूरपल्ली येथे सिरोंचा तालुक्यातून वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सडमाके यांनी माध्यमांना दिली.
कव्हरेजचीही समस्या
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातही वीज व कव्हरेजची समस्या आहे. याशिवाय या भागात इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.