खेळातून संकटांना सामोरे जाण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:31 AM2019-01-13T00:31:02+5:302019-01-13T00:31:41+5:30
आदिवासी समाज हा संघटित समाज म्हणून ओळखला जातो. हीच संघभावना आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खेळाचा उपयोग होतो. खेळ व खेळातून आलेली खिलाडीवृत्ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन सर्चच्या संचालिका डॉ.राणी बंग यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी समाज हा संघटित समाज म्हणून ओळखला जातो. हीच संघभावना आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खेळाचा उपयोग होतो. खेळ व खेळातून आलेली खिलाडीवृत्ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन सर्चच्या संचालिका डॉ.राणी बंग यांनी केले.
जय गोंडवाना युवक, युवती मंडळ पुस्टोला व सर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ.के.व्ही.चारी यांच्या स्मृतीनिमित्त आदिवासी युवा खेळ व सांस्कृतिक उत्सवाअंतर्गत धानोरा तालुक्याच्या पुस्टोला येथे युवक, युवतींच्या व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धा १० ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलीे. गुरूवारी सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा माजी आ.हिरामण वरखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य मैना कोवाची, सरपंच रंजना आतला, उपसरपंच सुकरू आतला, भूमैया गोमाजी आतला, पोलीस पाटील देवाजी आतला, गावपुजारी सिद्धू मडावी, महारू आतला, किडू हलामी, मधुकर हलामी, सुरेश कोवाची, देवराव कल्लो, रावजी आतला, देवराव आतला, शिक्षक देवराव उईके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.राणी बंग म्हणाल्या, आदिवासी समाजात असलेल्या अनेक प्रथा व परंपरावर अर्थ लक्षात न घेता बाहेरच्या समाजाकडून टीका केली जाते. पण आदिवासी समाजाला काय हवे आहे, हे ठरविण्याचा अधिकार बाहेरच्या समाजाला नसल्याचे त्या म्हणाल्या. ही संस्कृती टिकविण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे, असे त्यांनी सांगितले.
सदर क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण १३० संघ सहभागी झाले आहेत. यशस्वीतेसाठी सर्चचे जीवन शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र इसासरे, नाजूक जाडे, हरिदास साखरे, महादेव सातपुते व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. डॉॅ.रितू दमाहे यांच्या नेतृत्वात फिरत्या दवाखान्याची चमू आरोग्यसेवा देत आहे.