ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:40 AM2021-09-26T04:40:22+5:302021-09-26T04:40:22+5:30
अहेरी : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अहेरी ...
अहेरी : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. ग्रामीण भागातील नागरिक काेणतीही तक्रार करीत नाहीत. याचा गैरफायदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. मेंटेनन्स करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
मोकळ्या जागेची स्वच्छता करा
अहेरी : शहरातील अनेक मोकळ्या जागेत व प्लाॅटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. हा कचरा प्लाॅटधारकांच्या खासगी जागेत असल्याने स्वच्छता कर्मचारी तो साफ करीत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आणखी कचरा फेकला जातो. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन शहर सौंदर्य बाधित करीत आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
भामरागड : सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो, याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. शिवाय शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी केली आहे. असे झाल्यास गडचिराेली जिल्हा मुख्यालय व इतर तालुका मुख्यालयांचे अंतर कळण्यास मदत हाेईल.
बेरोजगारांना निधी उपलब्ध करावा
आष्टी : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसाहाय्य
आरमाेरी : मालगुजारी तलावात मत्स्यपालन व शिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व शिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांनी केली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील शिंगाडाची नागपूर बाजारपेठेत तसेच गडचिराेलीच्या बाजारपेठेत विक्री केली जाते.
अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच
कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे फावले आहे. पाच दिवसांचा आठवडा केला असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तास ड्युटी करणे आवश्यक आहे. मात्र थंब मशीन नसल्याने अनेक कर्मचारी उशिरापर्यंत कार्यालयात येऊन लवकरच निघून जातात.
अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा
गडचिराेली : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.