ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:41+5:302021-06-10T04:24:41+5:30

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता ...

Power poles in rural areas are dangerous | ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

Next

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पशुपालन योजनांची जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

कुरखेडा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.

रस्त्यावर कचरा ; कारवाई करा

देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.

मद्यपि वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा

गडचिराेली : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे व विद्यार्थी स्वगावी परतले तेव्हापासून बऱ्याच घरमालकांच्या खोल्या रिकाम्या आहेत. या घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

अहेरी : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावरील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जेनेरिक औषध साठा वाढविण्याची मागणी

गडचिराेली : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये सरकारच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषध साठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषध साठा वाढवण्याची मागणी आहे.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा

कुरखेडा : शहरातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र, ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकांवरील गावाचे नाव लिहिले असल्याने समजण्यास अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी

आरमाेरी : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीजपुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.

इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त

चामाेर्शी : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेटसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.

तलावातील अतिक्रमण हटवा

आलापल्ली : आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताल अतिक्रमणांचा विळखा निर्माण झाला असून विविध प्रकारच्या वनस्पतींनी या तलावाला वेढा घातला आहे. दुर्लक्षितपणामुळे देखभालीअभावी या तलावाचे रूपांतर आता बोडीत झाले आहे. येथील भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या एकमेव मामा तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

एटापल्ली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई हाेत नाही.

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा

काेरची : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Power poles in rural areas are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.