ग्रामीण भागातील वीजखांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:41 AM2021-09-23T04:41:57+5:302021-09-23T04:41:57+5:30
सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस वाढला सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा ...
सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस वाढला
सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाण निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधक नाही
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेईस्कर हाेणार आहे. गतिरोधकाअभावी वाहनांना अपघात हाेऊ शकतात.
गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत. लवकर फवारणी न झाल्यास नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येऊ शकते.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बस स्थानकातील वाहने नियंत्रणाविना
गडचिरोली : येथील बस स्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही, तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. पोलीस बंदोबस्ताअभावी बस स्थानक परिसरातील खासगी वाहने रात्री नियंत्रणाअभावी बेवारस राहतात.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीतजास्त टॉवर उभारण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.