आॅपरेटरअभावी वीज उपकेंद्र बंद
By admin | Published: May 29, 2016 01:37 AM2016-05-29T01:37:14+5:302016-05-29T01:37:14+5:30
शंकरपूर येथे सहा महिन्यांपूर्वीच ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आॅपरेटरची नियुक्ती ....
सहा महिन्यांपूर्वी काम पूर्ण : शंकरपुरातील ३३ केव्ही उपकेंद्र; नागरिक त्रस्त
कोरेगाव/चोप : शंकरपूर येथे सहा महिन्यांपूर्वीच ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आॅपरेटरची नियुक्ती करण्यात न आल्याने सदर विद्युत उपकेंद्र बंद स्थितीत आहे. ग्रामीण भागातील जनतेला याचा फटका बसत आहे.
शंकरपूर, चोप, कोरेगाव, बोडधा, रावणवडी, डोंगरमेंढा, कसारी, विठ्ठलगाव, पोटगाव, मोहटोला, किन्हाळा, पिंपळगाव या गावांसाठी विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने शंकरपूर येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र बांधण्यात आले. यासाठी लाखो रूपये खर्च झाले. मात्र या उपकेंद्रात वीज वितरण कंपनीने तज्ज्ञ आॅपरेटरची नेमणूक केली नाही. त्यामुळे सदर उपकेंद्र सुरू झाले नाही. सध्या कार्यरत असलेल्या वीज केंद्रावर अनेक गावांचा भार आहे. त्यामुळे आवश्यक त्या दाबाचा वीज पुरवठा होत नाही. परिणामी अनेक विद्युत उपकरणे सुरू होत नाही. परिणामी गावकरी त्रस्त आहेत.
सध्या उन्हाळा असल्याने कृषिपंप चालू नाहीत. तरीही कमी विद्युत दाबाचा पुरवठा सुरू आहे. विजेचा दाब कमी झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यास तार तुटली असल्याचे कारण वीज कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र दररोज तारा तुटतात काय, असाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना वीज कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ शंकरपुरातील ३३ के व्ही उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)