१७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोहोचली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:47 AM2017-07-24T02:47:44+5:302017-07-24T02:47:44+5:30
तालुक्यातील मुरखळा माल येथील काही नागरिकांनी गावापासून एक किमी अंतरावर घरे बांधून वस्ती करण्यास सुरूवात केली.
२२ वीज खांब व डीपी लावली : मुरखळा माल येथील नागरिकांमध्ये आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा माल येथील काही नागरिकांनी गावापासून एक किमी अंतरावर घरे बांधून वस्ती करण्यास सुरूवात केली. मागील १७ वर्षांपासून वीज पुरवठा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्याला यश येत नव्हते. जि.प. सदस्य कविता प्रमोद भगत यांच्या प्रयत्नानंतर मात्र एक महिन्यात या ठिकाणी वीज खांब पोहोचले असून वीज पुरवठाही २३ जुलैपासून सुरू झाला आहे.
मुरखळा माल येथील विनायक शेंडे, भैय्याजी नैताम, वासुदेव बुरे, गणपत वासेकर, सुभाष नैताम, संदीप नैताम यांनी गावापासून एक किमी अंतरावर २००० साली घर बांधून राहण्यास सुरूवात केली. वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पाचही कुटुंबांनी लोकप्रतिनिधी, वीज विभाग ग्रामपंचायत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना वीज खांब टाकून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला नाही. वीज नसल्याने सदर कुटुंब सोयीसुविधांपासून वंचित राहिले होते. जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत व माजी पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी या कुटुंबांना वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वीज वितरण कंपनीचे अभियंता रणदिवे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २२ वीज खांब, एक डीपी मंजूर केली. एक महिन्यात खांब गाडण्याचे व डीपी लावण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर २३ जुलै रोजी जि.प. सदस्य कविता भगत यांच्या हस्ते कळ दाबून विजेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्यांदाच घरापर्यंत वीज पोहोचल्याने कुटुंबांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी रवी धोटे, दिगांबर धानोरकर, अरूण बुरे, किर्ती सोमनकर उपस्थित होते.