मोठ्या भावाच्या अंत्यदर्शनानंतर लहान्याने सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:31 PM2019-06-03T22:31:10+5:302019-06-03T22:31:33+5:30
नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : नियतीचा डाव कुणाला चुकविता आला नाही. तसेच मृत्यू कुणाला चुकतही नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, हे शाश्वत सत्य आहे. पण काळाने अनपेक्षितपणे गाठले तर त्याचे जाणे अनेकांना चटका लागून जाते. अशीच काहीशी घटना मोहझरी गावात घडली. मोठ्या भावाचे अंत्यदर्शन घेऊन आलेल्या लहान भावानेही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने मोहझरी गावावर शोककळा पसरली आहे.
वैरागडपासून पाच किमी अंतरावर मोहझरी हे गाव आहे. २ जूनच्या रात्री १२.३० वाजता मधुमेहाच्या आजाराने कालिदास भिवा लोणबले (५५) याचा मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच गावातच राहणाऱ्या लहान भाऊ तुळशीदास भिवा लोणबले (५०) याने आपल्या भावाच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. पोटाच्या आजाराने त्रस्त असल्याने तुळशीदास हा आराम करण्यासाठी घरी आला. पहाटे ५ वाजतापासून तुळशीदासचा आजार वाढला आणि २ जूनला सकाळी ६ वाजता तुळशीदासची प्राणज्योत मालवली. लोणबले बंधूंना मोठी मुले आहेत. ही मुले आता कमाईला लागल्यामुळे दोन्ही भावांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळेल. परंतू घरातील ज्येष्ठ सदस्य कायमचा निघून गेल्याने त्याची हुरहूर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे कालीदास, तुळशीदाम या बांधवांच्या निधनानंतर कार्तिक कोटरंगे या युवकाचाही अचानक मृत्यू झाला. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात या तिघांचाही सक्रीय सहभाग असायचा. अवघ्या २४ तासात या तिघांवर काळाने झडप घातल्याने मोहझरी गावात शोककळा पसरली आहे.
कार्तिकच्या मृत्यूने हळहळले गाव
लोणबले बांधवांचा मृत्यू झाला त्या दिवशी २४ तासाच्या आत, म्हणजे २ जून रोजी रात्री ९ वाजता कर्करोगाच्या आजाराने कार्तिक कानू कोटरंगे याचा मृत्यू झाला. दोन भावांचा अंत्यविधी आटोपून आलेल्या गावकऱ्यांना कार्तिक कोटरंगे (३४) याच्या मृत्यूची बातमी रात्री ९ वाजता कळली. या बातमीने गावकऱ्यांना चटका बसला. कार्तिक हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. प्रामाणिक व कष्टाळू असलेला कार्तिक हा गावातील एका राईस मीलमध्ये दिवानजी म्हणून काम करीत होता. त्याच्या घरात म्हातारे वडील, पत्नी, दोन मुले आहेत. या सर्वांची जबाबदारी कार्तिकवर होती. कार्तिकचे वडील गावातील हनुमान मंदिराचे पुजारी म्हणून काम करीत आहेत. परंतू घरात कर्ता पुरूष असलेल्या कार्तिकच्या अकाली मृत्यूने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.