विजेअभावी धानपीक धोक्यात

By admin | Published: April 16, 2017 12:33 AM2017-04-16T00:33:24+5:302017-04-16T00:33:24+5:30

विसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली.

Predictable Paddy Pump in danger | विजेअभावी धानपीक धोक्यात

विजेअभावी धानपीक धोक्यात

Next

शेतकरी संतप्त : पिकांच्या पाणीपुरवठ्यात अडचण
अतुल बुराडे विसोरा
विसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मात्र विजेच्या लपंडावाने पाण्याअभावी सदर उन्हाळी धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहेत.
विसोरा-शंकरपूर या दोन गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीच्या पाण्याच्या भरवशावर विसोरा, शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी नदीच्या शंकरपूर कडील शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धान पिकाच्या उत्पादनासाठी बी-बियाणे नांगरणी, वखरणी, पेरणी, चिखल, रोवणी, निंदण, औषध फवारणी, कापणी, मळणी या सर्व जंजाळातून धानरास घरी येण्यासाठी धान पिकाला पाणी पुरवठा आवश्यक आहे. मात्र मागील महिनाभरापासून शंकरपूर नदी घाटावरील डीपीवर डीओ व फेज जात असल्याने शेतीला पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने या परिसरातील धानपीक करपल्यागत झाले आहे.
वीज पुरवठा सुरू झाल्यावर अगदी काही वेळात वीज पुरवठा खंडीत होते. परिणामी पिकाला पुरेसे पाणी होत नसल्याने उभ्या पिकाखालील जमिनीला भेगा पडल्या असून येत्या आठवड्याभरात धान पीक पूर्णत: करपण्याची शक्यता आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी कमालीचा संतापला आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक व शेतकरी स्वत: दिवस रात्र एक करून वीज पुरवठा सुरू करतात. महिनाभरापूर्वी नवीन डीपी सुरू करण्यासाठी महावितरणकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. मात्र या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खंडीत वीज पुरवठ्याची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेकडो एकरवरील धान पीक करपून नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर समस्या दूर करण्यासाठी आमदार क्रिष्णा गजबे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत परत त्याच डीपीवरून अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून वीज पुरवठा सुरू केला. तरीही नवीन डीपीची मागणी कायम आहे.

महावितरणचे अधिकारी गैरहजर
गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुमारास शंकरपूर येथील १०-१५ शेतकऱ्यांनी थेट देसाईगंज येथील महावितरणचे कार्यालय गाठले. मात्र या कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. ज्या डीपीवरून शेतकऱ्यांच्या शेतीला वीज पुरवठा होतो. ती डीपी वारंवार पेट घेतल्याने पूर्णत: खराब झाली आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कृषीपंप डीपीला जोडल्याने ही वीज खंडीत पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. सातत्याने मागणी करूनही सद्य:स्थितीत नवीन डीपी लावणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती अभियंता शेतकऱ्यांना देतात.

Web Title: Predictable Paddy Pump in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.