निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ऑनलाईनला बगल, ऑफलाईनलाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:20+5:302021-02-05T08:55:20+5:30
जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ व २० जानेवारी राेजी घेण्यात आली. २२ जानेवारी राेजी निकाल घाेषित करण्यात आला. ...
जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ व २० जानेवारी राेजी घेण्यात आली. २२ जानेवारी राेजी निकाल घाेषित करण्यात आला. निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च करू नये, यासाठी खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. निकाल लागल्याच्या एक महिन्याच्या आत सर्वच उमेदवारांना निवडणूक खर्च निवडणूक विभागाकडे सादर करावा लागते. निवडणूक खर्च ऑनलाईन सादर करण्याची सुविधा निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश उमेदवार ऑफलाईन पध्दतीनेच तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक खर्च सादर करीत आहेत. निवडून आलेल्या बहुतांश उमेदवारांनी खर्च सादर केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बाॅक्स
पराभूत उमेदवारांची पाठ
निवडणुकीसाठी उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीचा खर्च सादर करणे आवश्यक आहे. मात्र जे उमेदवार निवडून आले, तेच निवडणूक खर्च सादर करतात. पराभूत झालेले उमेदवार खर्च सादर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. नियमानुसार पराभूत उमेदवारांनीसुद्धा उमेदवारी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना अपात्र घाेषित करून पुढची निवडणूक लढण्यास प्रतिबंध घातला जातो. मात्र या नियमाबाबत उमेदवारांमध्ये जागृती नसल्याने पराभूत उमेदवार खर्च सादर करीत नसल्याचे दिसून येते.
ऑनलाईन खर्च सादर करण्यात अनेक अडचणी
निवडणूक खर्च ऑनलाईन सादर करण्याची सुविधा निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिली असली तरी यात अनेक अडचणी येतात. अनेकांना ऑनलाईन खर्च कसा सादर करावा, याबाबत माहिती नाही. बहुतांश गावांमध्ये इंटरनेट स्पीड नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना गडबड हाेण्याची शक्यता राहते. त्यामुळे उमेदवार खर्च ऑनलाईन सादर न करता ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात खर्चासंबंधी कागदपत्रे सादर करीत आहेत.
काेट
आमच्या गावाकडे कव्हरेज राहत नाही. तसेच ऑनलाईन खर्च कसा सादर करावा, हे आपल्याला माहीत नाही. आमच्या परिसरातील बहुतांश उमेदवार तहसील कार्यालयातच प्रत्यक्ष खर्चाशी संबंधित कागदपत्रे सादर करीत आहेत. त्यामुळे आपणही प्रत्यक्ष तहसील कार्यालयात जाऊन खर्च सादर करू.
- महेश कांबळे, उमेदवार
ग्रामपंचायती ३६१
उमेदवार ५३९३