परिसर स्वच्छता काळाची गरज
By admin | Published: October 4, 2016 01:00 AM2016-10-04T01:00:54+5:302016-10-04T01:00:54+5:30
समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे.
खासदारांचे प्रतिपादन : चामोर्शीत स्वच्छता अभियानाचा समारोप
चामोर्शी : समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून स्वच्छता पाळावी. आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
चामोर्शी नगर पंचायतीच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या अभियानाचा समारोप २ आॅक्टोबर रोजी करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. अशोक नेते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, पोलीस निरीक्षक किरण अवचर, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे आदी मान्यवर उपस्थित होते. सप्ताहादरम्यान पथनाट्य, नृत्य, नाट्याविष्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या बा. म. सहारे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, जा. कृ. बोमनवार हायस्कूल, यशोधरा विद्यालय, राजमाता राजकुंवर आश्रमशाळा, के. डी. डी. महाविद्यालयांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या छबीलदास संघवी व रवी मेकर्तीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैैताम यांनी चामोर्शी शहराच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचे आवाहन केले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने नागरिकांना कापडी पिशवी वितरित केली. प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही, संचालन राकेश खेवले तर आभार नगरसेवक रोशनी वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)